सावंतवाडी : न्यायालयीन कामकाजात अचूक मसुदा लेखन आणि प्रभावी युक्तिवाद हेच वकिलाच्या यशाचे गमक: ॲड. श्रीकृष्ण ओगले

शेअर करा

सावंतवाडी,दि.११ सप्टेंबर
न्यायालयीन कामकाजात अचूक मसुदा लेखन (Drafting) आणि प्रभावी युक्तिवाद हेच कोणत्याही वकिलाच्या यशाचे खरे गमक असते, असे प्रतिपादन कायदेतज्ज्ञ ॲड. श्रीकृष्ण ओगले यांनी केले.
​सावंतवाडी तालुका वकील संघटनेतर्फे आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालयात गुंफण्यात आले. या व्याख्यानात ‘ड्राफ्टिंग आणि प्लिडिंग’ या विषयावर वेंगुर्ला येथील प्रसिद्ध वकील ॲड. श्रीकृष्ण ओगले हे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
​न्यायालयात खटला दाखल करताना ड्राफ्टिंग किती स्पष्ट, कायदेशीर मुद्द्यांना धरून आणि संक्षिप्त असावे, याचे तंत्र ॲड. ओगले यांनी विविध उदाहरणांसह समजावून सांगितले. न्यायाधीशांसमोर आपला पक्ष मांडताना कायद्याचे ज्ञान आणि भाषेवरील प्रभुत्व कसे वापरावे, यावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कायदेशीर दस्तऐवज तयार करताना जुन्या खटल्यांचे संदर्भ देऊन आणि कायद्यातील नवीन बदल यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तद्नंतर झालेल्या चर्चासत्रामध्ये त्यांनी वकील व विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
​कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲड. श्रीकृष्ण ओगले यांचे स्वागत सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी बाबूराव रणशूर यांनी केले.
​यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा महिला उपाध्यक्ष ॲड. नीता गावडे, सावंतवाडी वकील संघटनेचे ॲड. राघवेंद्र नार्वेकर, ॲड. राबिया आगा, ॲड. अंकुश ठाकूर, ॲड. परशुराम चव्हाण, ॲड. अलका कासकर, ॲड. राहुल मडगावकर, ॲड. वामन निर्गुण यांच्यासह वकीलवर्ग व विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रिया सावंत यांनी केले, तर आभार प्रदर्शन सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. बाळाजी रणशूर यांनी मानले.

शेअर करा