सावंतवाडी, दि. १९ जून
आजगाव दशक्रोशीत सध्या मायनिंग सर्वेक्षणावरून जोरदार चर्चा सुरू असून, परिसरातील वातावरण काहीसे गंभीर बनले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री , सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आजगाव येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी लोकांच्या समस्या अत्यंत संयमाने आणि हळुवारपणे ऐकून घेत यावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. प्रशासन आणि आपण स्वतः नेहमीच ग्रामस्थांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ग्रामस्थांच्या आग्रहाखातर मंत्री नितेश राणे यांनी आजगाव येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी प्रमुख गावकऱ्यांच्या उपस्थितीत देवाकडे गाऱ्हाणे घालण्यात आले. “गावातील मायनिंग प्रकल्प रद्द होण्यासाठी सुबुद्धी मिळू दे, तसेच जिल्ह्यात चांगले पर्यटन प्रकल्प येऊ दे जेणेकरून गोव्याला जाणाऱ्या स्थानिक मुलांना सिंधुदुर्गातच रोजगार मिळेल,” असे साकडे वेतोबा चरणी घालण्यात आले.
विशेष म्हणजे, हे गाऱ्हाणे घालत असताना गावकऱ्यांनी, “माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्याप्रमाणेच नितेश राणे यांनाही भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे,” अशी इच्छा व्यक्त करत वेतोबा चरणी केळ्याचा घड अर्पण करण्याचा नवस केला. यावर उपस्थित सर्वच ग्रामस्थांनी ‘होय महाराजा’ म्हणत नितेश राणे यांना भावी मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या.
सुरुवातीला काही ग्रामस्थांनी ‘तुम्ही देवळात नारळ ठेवा, तरच आम्हाला खात्री पटेल’ अशी भूमिका घेतली होती. ग्रामस्थांच्या या भावनेचा आदर करत मंत्री राणे यांनी मंदिरात जाऊन गाऱ्हाणे केले तेथे उपस्थित राहून श्री देव वेतोबा ला हात जोडले व सर्वांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
या बैठकीला आणि गाऱ्हाण्याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, तालुका मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ व मधुकर देसाई, प्रवीण देसाई, अँड स्वप्नील प्रभू आजगावकर यांच्यासह आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.