सावंतवाडी : आंबोलीत चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस, तरीही नुकसान भरपाई शून्य; महसूल विभागाच्या कारभारावर ग्रामस्थ संतप्त

शेअर करा

सावंतवाडी,दि.११ सप्टेंबर
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आंबोली परिसरात चेरापुंजीपेक्षाही अधिक पाऊस पडला. तरीसुद्धा अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या एकाही ग्रामस्थाला प्रशासनाकडून रुपयाचीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. महसूल विभागाच्या या भोंगळ आणि बेजबाबदार कारभारामुळे आंबोली ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत, असा थेट आरोप आंबोलीच्या माजी सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी केला आहे.
​जुलै व ऑगस्टदरम्यान आंबोली आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. अनेकदा पूरस्थिती निर्माण झाली, घाटातील रस्त्यांवर झाडे व दरडी कोसळल्या. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ग्रामस्थांच्या घरांची व वाड्यांची छपरे उडून गेली, तर घरांवर आणि मांगरांवर झाडे पडली. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटल्याने सलग १० ते १५ दिवस वीज गायब होती.
​आयएमडीचे (IMD) पर्जन्यमापक ठप्प, तरीही त्याच अहवालावर कारवाई
आंबोलीत भारतीय हवामान विभागाने (IMD) बसवलेले पर्जन्यमापक हे सौर ऊर्जेवर (Solar energy) चालणारे आहे. मात्र, आंबोलीतील दाट धुके आणि सततच्या अतिवृष्टीमुळे हे उपकरण योग्य प्रकारे कार्यरत नव्हते. दुसरीकडे, आंबोलीतील स्थानिक रहिवासी भाऊ ओगले यांच्याकडील ‘मॅन्युअल’ पर्जन्य नोंदणीनुसार या कालावधीत अतिवृष्टी झाल्याची स्पष्ट नोंद आहे. असे असतानाही, महसूल विभागाने कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता किंवा वस्तुस्थितीची शहानिशा न करता “आंबोलीत पाऊस पडलाच नाही व वादळी वारे सुटलेच नाहीत” असा अहवाल तयार केला. या चुकीच्या अहवालाच्या आधारे नुकसान भरपाईची सर्व प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत.
​शासकीय लाभ आणि अनुदानापासून आंबोलीकर अजूनही वंचित
आंबोली परिसर वर्षानुवर्षे ‘कबुलयतदार’ जमिनीच्या प्रलंबित प्रश्नामुळे वेगवेगळ्या शासकीय योजना आणि अनुदानांपासून वंचित राहिला आहे. त्यातच अतिवृष्टी, वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतीचे नुकसान आणि आता निसर्गाच्या कोपानंतर प्रशासनाची ही अक्षम्य हेळसांड यामुळे आंबोलीकरांवर अन्याय होत आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा विचार करून महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत व सर्व बाधित ग्रामस्थांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरत आहे.

शेअर करा