सावंतवाडी,दि.११ जून
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सावंतवाडी उपअभियंता बांधकाम विभाग कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कार्यालयातील कर्मचारी दुपारी कामाच्या वेळेतच मटन बिर्याणी पार्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार एका जागृत नागरिकाने समोर आणला आहे. याप्रकरणी सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. गणपत कदम यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांकडे लेखी तक्रार दाखल करत संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारदार गणपत कदम यांनी दिलेल्या पत्रानुसार, काल दिनांक १० जून रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ते काही कामासाठी सावंतवाडी उपअभियंता बांधकाम विभाग कार्यालयात गेले होते. यावेळी कार्यालयातील बहुतांश कर्मचारी आपल्या टेबलवर उपस्थित नसून एका खोलीत गोळा झाले होते. कदम यांनी तिथे जाऊन पाहिले असता, शासकीय नियमांची पायमल्ली करत काही कर्मचारी थेट मटन बिर्याणी ओरपण्यात दंग होते.
विशेष म्हणजे, कार्यालयातील महिला सहाय्यक अभियंत्या रजेवर असताना त्यांच्या केबिनचा आणि शासकीय जागेचा गैरवापर करून ही पार्टी सुरू होती. तक्रारदाराने याबाबत विचारणा केली असता, तिथल्या कर्मचाऱ्यांनी उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरत त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच एका बाहेरच्या अज्ञात व्यक्तीने कदम यांना रोखत “हे आमचे वैयक्तिक मॅटर आहे, तुम्ही यात पडू नका,” अशी धमकीवजा तंभीही दिली.
या सर्व प्रकारानंतर संतप्त झालेल्या कदम यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना पत्र लिहून कार्यालयातील या सावळ्यागोंधळाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. “शासकीय कार्यालयात राजरोसपणे मटन पार्ट्या झोडल्या जात असतील, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? येथील काही कर्मचारी मुजोर झाले असून त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा किंवा प्रशासनाचा कोणताही धाक उरलेला नाही,” असा आरोप कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. याबाबत उपसभापती गौरव मुळीक यांचेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न गणपत कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून उपस्थित केला आहे.