सावंतवाडी, दि. १७ जुलै
सावंतवाडी कोलगाव येथील फिरोज शेख या कथित बाबाला माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरिजा गितेश राऊत यांच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी ठाणे कापूरबावडी पोलीस ठाण्याकडून शिंदे गटाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांना १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. दरम्यान, संजू परब यांनी मला कोणतीही नोटीस आलेली नाही, असे म्हणत वैभव नाईक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.
पत्रकार परिषदेत वैभव नाईक म्हणाले की, या नोटिसीवरून संजू परब देखील फिरोज भोंदू बाबाकडे जात होते हे आता उघड झाले आहे. कालपर्यंत शिंदे गटाचे पदाधिकारी राऊत यांच्यावर आरोप करत होते, आता मात्र स्वतः शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख या भोंदू बाबाच्या संपर्कात असल्याचे समोर आल्याने सत्ताधारी त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.
वैभव नाईक यांच्या या आरोपाला संजू परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाईक यांचे आरोप फेटाळताना परब म्हणाले की, वैभव नाईक सध्या सैरभैर झाले असून ते काहीही बरळत आहेत. मला नोटीस आली असेल तर ती आधी वैभव नाईक यांच्याकडे कशी गेली? यावरून यामागे मोठे गौडबंगाल असल्याचे स्पष्ट होते. मला कोणतीही नोटीस आलेली नाही, आणि जर मला नोटीस आली तर त्याचे उत्तर देण्यास मी पूर्णपणे सक्षम आहे, असे परब यांनी स्पष्ट केले