अन्यथा उपोषणाचा इशारा
सावंतवाडी,दि.१० ऑगस्ट
भारतीय संविधानाच्या ७५ व्या गौरवशाली वर्षानिमित्त सावंतवाडी येथील नगरपरिषद कार्यालय परिसर, तालुक्यातील महत्त्वाची कार्यालये आणि मुख्य चौक या ठिकाणी संविधानाची कोरीव दगडी उद्देशिका (Preamble) बसवण्यात यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टी (बी.एस.पी.) सावंतवाडी तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील एक निवेदन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज, १० ऑगस्ट २०२६ रोजी सावंतवाडीच्या नगराध्यक्षांना सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय स्वातंत्र्याचे औचित्य साधून येत्या १५ ऑगस्ट २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात ही उद्देशिका बसवण्यात यावी. यामुळे नागरिकांमध्ये घटनात्मक मूल्यांचा प्रचार होईल आणि संविधानाचा गौरव वाढेल.
तसेच, जर १५ ऑगस्ट रोजी ही उद्देशिका बसवली गेली नाही, तर बहुजन समाज पार्टीच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष अरुण लक्ष्मण जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.