सावंतवाडी : गणेशोत्सवात प्रवाशांशी प्रामाणिक राहा, अन्यथा कडक कारवाई; कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे चालकांना आवाहन

शेअर करा

सावंतवाडी दि.८ सप्टेंबर
येत्या १४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालक आणि मालकांना प्रवाशांशी सौजन्याने व प्रामाणिकपणे वागण्याचे आवाहन केले आहे. सणानिमित्त मुंबई, पुणे आणि महाराष्ट्राच्या इतर भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आणि नागरिक रेल्वे स्थानके व बस स्थानकांवर दाखल होणार आहेत. या काळात प्रवाशांची कोणतीही अडवणूक न करता त्यांना योग्य व सुरळीत सेवा देण्याच्या सूचना रिक्षा टॅक्सी महासंघाने दिल्या आहेत.
​रेल्वे व बस स्थानक परिसरात रिक्षा शिस्तीत आणि रांगेत उभ्या कराव्यात. प्रवाशांकडून वाजवी भाडेच आकारावे, अतिरिक्त भाड्यासाठी हुज्जत घालू नये, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, अंध आणि अपंग प्रवाशांची योग्य काळजी घेऊन रात्री-अपरात्री स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी चालकांनी घ्यावी, असे महासंघाने स्पष्ट केले.
​एखाद्या प्रवाशाची बॅग किंवा मौल्यवान वस्तू रिक्षात विसरल्यास ती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावी किंवा संबंधित प्रवाशाला परत करावी. ‘प्रवासी हेच आपले दैवत आहे’ या भावनेने गणेशोत्सवाच्या काळात सेवा द्यावी, असे आवाहन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
​दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे स्टेशन व बस स्थानक परिसरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) आणि पोलीस अधिकाऱ्यांची विशेष पथके तैनात असणार आहेत. प्रवाशांची अडवणूक, लुबाडणूक किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही रिक्षा टॅक्सी महासंघाने दिला आहे.

शेअर करा