सावंतवाडी : कोकणात सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; शेतकर्‍यांना पाण्याचे नियोजन करण्याचे कृषी विद्यापीठाचे आवाहन

शेअर करा

सावंतवाडी दि.४ सप्टेंबर
हवामान विभागाच्या विस्तारित श्रेणीतील (ERFS) अंदाजानुसार, येत्या दोन आठवड्यांत कोकण विभागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकणात आधीच गेल्या तीन महिन्यांत अपुरा पाऊस झाला असून, सप्टेंबर महिन्यातही पावसाची तूट राहण्याचा अंदाज असल्याने भात पिकाला पाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी शेतकर्‍यांनी आवश्यक काळजी घ्यावी, असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे यांच्याकडून देण्यात आला आहे.
​आठवडानिहाय पावसाचा अंदाज:
​पहिला आठवडा (३ ते १० सप्टेंबर): या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा वगळता कोकणातील उर्वरित सर्व जिल्ह्यांत दररोज ५ ते १० मिमी पावसाची शक्यता आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिन १ ते ५ मिमी पाऊस पडू शकतो. हा पाऊस पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सरासरीपेक्षा ४ ते ७ मिमीने कमी, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ७ ते १० मिमीने कमी राहण्याचा अंदाज आहे.
​दुसरा आठवडा (१० ते १७ सप्टेंबर): या काळातही सिंधुदुर्ग वगळता उर्वरित कोकणात दररोज ५ ते १० मिमी, तर सिंधुदुर्गात १ ते ५ मिमी पावसाचा अंदाज आहे. हे प्रमाण पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यांत सरासरीपेक्षा २ ते ४ मिमीने कमी असेल, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ५ ते ७ मिमीने कमी राहण्याची शक्यता आहे.

शेअर करा