सावंतवाडी,दि.०९ ऑगस्ट
राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी आणि सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोमवार, १० ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता भारतीय माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली भाजपने भव्य ‘तिरंगा यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शहरात ५ विशेष ‘तिरंगा सेल्फी पॉईंट’ आणि माध्यमिक शाळांसाठी ‘देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा’ देखील आयोजित करण्यात येणार आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून आयोजित तिरंगा यात्रा बाबत भाजपचे युवा नेते विशाल परब, जिल्हा संयोजक संदीप गावडे, उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर आदींनी ही माहिती दिली.
तिरंगा यात्रेचा मार्ग आणि नियोजन
ही तिरंगा यात्रा सकाळी ९:३० वाजता श्री देव उपरलकर देवस्थान येथून सुरू होईल. तेथून गवळी तिठा, बसस्थानक, मोती तलाव परिसर मार्गे जात श्री जगन्नाथराव भोसले उद्यान येथे यात्रेचा समारोप होईल.
सकाळी ९:३० वा.: नोंदणी, भारत माता पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
सकाळी ९:५० वा.: सामूहिक राष्ट्रगीत
सकाळी १०:०० वा.: तिरंगा यात्रेला प्रारंभ
सकाळी ११:०० वा.: भोसले उद्यान येथे आगमन, माजी सैनिकांचा सत्कार, मार्गदर्शन व समारोप होणार आहे.
युवकांसाठी आकर्षण आणि स्पर्धा:
नागरिकांमध्ये देशभक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी शहरात पाच ठिकाणी ‘तिरंगा सेल्फी पॉईंट’ उभारले जाणार आहेत. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त आणि सांघिक भावना रुजवण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील माध्यमिक शाळांसाठी ‘देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांचे नेतृत्व हे असणार आहे. समारोपाच्या वेळी या निवृत्त सैनिकांचा विशेष सत्कार करण्यात येईल.
”ही यात्रा केवळ पाहण्यासाठी नसून प्रत्येकाने यात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी आहे. सावंतवाडीतील सर्व नागरिक, सैनिक, विद्यार्थी, युवक, महिला व विविध संस्थांनी हातात तिरंगा घेऊन या राष्ट्रकार्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन भाजपच्या आयोजकांनी केले आहे.