प्रस्तावाविरोधात हरकती नोंदवण्याचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांचे आवाहन
सावंतवाडी,दि.२४ ऑगस्ट
केंद्र शासनाकडून २७ जुलै रोजी सावंतवाडी नगरपरिषद हद्दीसाठी प्राप्त झालेल्या ‘इको सेन्सिटिव्ह झोन’च्या (पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र) अधिसूचनेला जोरदार विरोध सुरू झाला आहे. या अधिसूचनेविरोधात शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे. नगरपरिषद हद्दीत हा झोन लागू झाल्यास शहराच्या भविष्यातील विकासाला मोठा ब्रेक लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर सावंतवाडी नगरपरिषदेने १४ ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या एकमताने ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ला स्पष्ट विरोध दर्शवणारा ठराव मंजूर केला आहे. या झोनमुळे शहरात कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामांना परवानगी मिळणार नाही. तसेच नवीन विकास प्रकल्प, स्थानिक व्यवसाय, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या कामांवर कठोर बंधने येतील. यामुळे शहराचा संपूर्ण विकास थांबून नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागेल, अशी भीती उपनगराध्यक्षांनी व्यक्त केली.
नगरपरिषदेने घेतलेल्या विरोध ठरावाला अधिक बळ देण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढे येणे गरजेचे आहे. नागरिकांनी ‘मुख्याधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद’ यांच्या नावाने किमान २ ते ३ हजार हरकती नोंदवाव्यात. नागरिकांच्या या सर्व हरकती आणि प्रशासकीय कागदपत्रे एकत्र करून केंद्र शासनाकडे पाठवली जातील, ज्यामुळे हा बाधक ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे अधिक सक्षमपणे मांडता येईल, असे ॲड. अनिल निरवडेकर यांनी स्पष्ट केले.