सावंतवाडी,दि.२४ ऑगस्ट
सावंतवाडी शहरात सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून देण्याची तयारी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दर्शवली आहे. यासंदर्भात गुरुवारी सविस्तर आराखडा तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना दिले.
सावंतवाडी येथील कार्यालयातील बैठकीत आमदार केसरकर यांनी पोलीस प्रशासनासोबत शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा आणि आंबोली घाटातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर सविस्तर चर्चा केली.
यावेळी माहिती देताना पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले की, सावंतवाडी शहरात सुरक्षेच्या दृष्टीने एकूण २६ महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. त्यासाठी २३ लाख, ३८ लाख आणि ५४ लाख रुपयांचे वेगवेगळे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
यावर बोलताना आमदार केसरकर म्हणाले, “मी पालकमंत्री असताना शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. ते आता नादुरुस्त झाले असल्यास दुरुस्तीसाठी काय खर्च येईल याचा आढावा घ्या. तसेच जुने पोल आणि बॅटरी पुन्हा उपयोगात आणता येतील का, ते तपासून गुरुवारी अंतिम आराखडा सादर करावा. यासाठी आवश्यक असणारा आमदार निधी तात्काळ उपलब्ध करून दिला जाईल.”
आंबोली घाटातील वाहतूक कोंडीवर तोडगा:
आंबोली घाटातील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून योग्य पार्किंग व्यवस्था उभारणे गरजेचे असल्याचे मत आमदार केसरकर यांनी व्यक्त केले. यावर बोलताना, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम म्हणाले,जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन यावर प्राथमिक नियोजन केले असल्याचे सांगितले. आमदार केसरकर यांनी पार्किंगसाठी काही संभाव्य जागा सुचविल्या असून, पोलीस प्रशासनाकडून या जागांचा आढावा घेतला जात आहे.
दरम्यान, आगामी श्री गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून विशेष बैठकीचे आयोजन करावे, असे निर्देशही आमदार दीपक केसरकर यांनी या वेळी दिले.