पावसात तब्बल १६१२ मि.मी.ची घट; वाढत्या तापमानामुळे शेती संकटात
सावंतवाडी,दि.१४ ऑक्टोंबर
जागतिक हवामान बदलाचे गंभीर परिणाम आता मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दिसू लागले आहेत. यंदा पावसाचे प्रमाण निम्म्यावर आल्याने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाकडून दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील ‘ग्रामीण कृषि मौसम सेवा’ केंद्राच्या हवामान नोंदींवरून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुळदे हवामान केंद्राने दिलेल्या आकडेवारीनुसार, १ जानेवारी ते १४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात २,१८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३,८०१ मि.मी. पाऊस झाला होता. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण तब्बल १,६१२ मि.मी.ने घटले आहे. गेल्या वर्षी वर्षभरात एकूण ४,०४७.५ मि.मी. पाऊस पडला होता, त्याच्या तुलनेत यंदाची तूट अत्यंत मोठी आहे.
पावसाच्या घटीसोबतच जिल्ह्यात ‘ऑक्टोबर हिट’चा कडाका वाढला आहे. गेल्या २४ तासांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. गतवर्षी याच दिवशी हे तापमान ३५.६ अंश सेल्सिअस होते. दुपारी हवेतील आर्द्रता अवघी ३२ टक्के नोंदवली गेली असून दररोज ३.४ मि.मी. वेगाने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.
या अचानक झालेल्या हवामान बदलाचा मोठा फटका स्थानिक शेतीला बसत आहे. पावसाअभावी भातशेतीचे नुकसान झाले असून, अवेळी वाढलेल्या तापमानामुळे आंबा आणि काजू बागांना मोहर येण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी खालावल्याने रब्बी हंगामावर आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी आणि महसूल विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. हवामान तज्ज्ञांनी बागायतदार आणि शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचा आणि पिकांच्या मुळांशी आच्छादन (मल्चिंग) करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान भूजल पातळी वाढवणे आणि पाणीटंचाईची समस्या कायमची दूर करण्यासाठी कच्चे बंधारे बांधण्यासाठी सर्वांनी आघाडी घेतली आहे. मात्र उष्णता वाढत असल्याने बाष्पीभवन होत असल्याने ऐन हंगामात पाणी पुरवठा बाबत काळजी घ्यावी लागणार असल्याने पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.