सावंतवाडी तालुक्यात ‘ओंकार’ हत्तीच्या वापरामुळे गणेशभक्तांना चिंता

शेअर करा

सावंतवाडी,दि.०८ सप्टेंबर
महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमावर्ती भागात वावरणारा ‘ओंकार’ हा जंगली हत्ती सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे येथून कास या गावी दाखल झाला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरच हत्तीचा गावांमध्ये वावर वाढल्याने स्थानिक नागरिक, भजन मंडळ व महिला वर्ग यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.


​सोमवारी नेतर्डे-गावठणवाडी येथील वृद्ध शेतकरी लाडू गवस यांच्या केळी व माड बागायतीचे ओंकार हत्तीने अतोनात नुकसान केले. कष्टाने उभारलेली मंडल जातीच्या केळीची बागायती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे पाहून शेतकरी गवस यांना अश्रू अनावर झाले. “आम्हाला शासनाची तुटपुंजी नुकसानभरपाई नको, आधी या हत्तीला तिलारी येथील नैसर्गिक अधिवासात सोडा,” अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


​दरम्यान, हत्तीचे अचूक लोकेशन देण्यात वनविभाग अपयशी ठरल्याचा आरोप नेतर्डेचे उपसरपंच प्रशांत कामत यांनी केला आहे. “हाकारी पथक हत्तीचा शोध घेण्याऐवजी रस्त्यावर किंवा मंदिरात थांबून राहते. त्यांच्यासोबत वनविभागाचा कर्मचारी नसतो. हत्तीच्या नावाखाली निधी लाटण्याचा प्रकार सुरू आहे,” असा गंभीर आरोप कामत यांनी केला. तसेच हत्तीने हल्ला केल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करत बागायतीचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली.


​याबाबत दोडामार्ग वन अधिकारी संभाजी पाटील यांनी सांगितले की, “ओंकारला तिलारी येथील कळपात नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला शिरवल धरणापर्यंत नेण्यात आले होते, मात्र तो पुन्हा मागे फिरला. स्थानिकांना हत्तीच्या हालचालींची माहिती मिळावी व ते सतर्क राहावेत, यासाठी पथकाला स्पीकर दिले जातील.”

शेअर करा