गॅस सिलिंडर व पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेस आक्रमक; प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन सादर
सावंतवाडी, दि. १० जून
देशभरात गगनाला भिडलेल्या गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट कोलमडले असून, या वाढत्या महागाईच्या विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सावंतवाडी येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर हे या गंभीर परिस्थितीवर पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. या संदर्भात जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार मनोज मुसळे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने वाढत असल्याने गृहिणींचे घर चालवणे कठीण झाले आहे. त्यातच सध्या गॅस सिलिंडर मिळण्यासाठी तब्बल महिन्याभराची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. इंधन दरवाढीमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडले असून, भविष्यात ही महागाई आणखी किती होरपळणार, अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांची अडचण: कॅनमधून डिझेल देण्याची मागणी:
सध्या पावसाळा सुरू झाला असून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात शेतीकामांना वेग आला आहे. आधुनिक शेतीसाठी शेतकरी पेट्रोल-डिझेलवर चालणारी लहान यंत्रे वापरतात. मात्र, सध्या इंधनाचा तुटवडा जाणवत असून शेतकऱ्यांना कॅनमधून इंधन देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पेट्रोल पंप चालकांना कॅनमधून इंधन देण्याबाबत तात्काळ प्रशासनाने सूचना द्याव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
अवैध उत्खनन आणि गांजा शेतीचा मुद्दा ऐरणीवर:
या आंदोलनादरम्यान शिष्टमंडळाने स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मतदारसंघातील गंभीर मुद्द्यांकडे लक्ष वेधले. सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन सुरू असून, तिलारी धरण परिसरात बेकायदेशीर गांजा शेतीची लागवड केली जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकारांवर प्रशासनाने तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
…अन्यथा प्रत्येक तालुक्यात आंदोलन छेडणार!
“प्रशासनाने जनतेच्या या तीव्र भावनांचा आदर करून महागाई, इंधन तुटवडा आणि अवैध धंद्यांची गांभीर्याने दखल घ्यावी. वरिष्ठ पातळीवर सकारात्मक पत्रव्यवहार करून जनतेला न्याय न दिल्यास, आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिला आहे.
यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साईनाथ चव्हाण, ज्येष्ठ नेते ॲड. दिलीप नार्वेकर, महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, युवक जिल्हाध्यक्ष किरण टेबूंलकर, नगरसेवक तौकीर शेख, ओबीसी सचिव अमिदि मेस्त्री, माजी नगरसेवक राजेंद्र मसुरकर, माजी जि. प. सदस्य नागेश मोरये, प्रदेश सेवादल अध्यक्ष अजिंक्य गावडे, जिल्हा उपाध्यक्ष मेघनाद धुरी, रवींद्र उर्फ बाब्या म्हापसेकर, कृष्णा उर्फ बाळा धाऊसकर, ॲड. समीर वंजारी, सुमेधा सावंत, संजय लाड, भाई जेठे, प्रणाली नाईक, माजी नगरसेविका सुमेधा धुरी, सौ. नेवरेकर, संदीप सुकी, सुधीर मल्हार, कौस्तुभ पेडणेकर उपस्थित होते.
तसेच सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, देवानंद लुडबे, मधुकर लुडबे, ओटवणे उपसरपंच संतोष कासकर, दादा नेवरेकर, उमेश मोंडकर, दिलीप तळगावकर, सगुण गावकर, मेघश्याम लुडबे, दिलीप राणे, संतोष तावडे, निलेश पावसकर, काशीराम शिरोडकर, सतीश कदम, डॉ. प्रमोद कदम, ॲड. राजन यादव, दीपक जाधव, केशव जुवाटकर, उत्तम मोंडकर, अभय शेलटकर, हनु लोणे, हेमंत आरोलकर, बाळकृष्ण खोत, मुस्तफिन पाटणकर, राकेश सागवेकर, लक्ष्मण शिरोडकर व इतर शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी चिटणीस नाका येथून हा मोर्चा निघाला तो प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे बॅनर झळकत होते. तसेच महागाई विरोधात गॅस सिलिंडर सह बॅनर घेऊन घोषणाबाजीही करण्यात आली. आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बॅनर झळकले.