सावंतवाडी, दि.०८ जून
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, दिनांक १० जून रोजी सकाळी ११:३० वाजता सावंतवाडी येथे निषेध आंदोलन करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. जिल्हाभरातील या आंदोलनाची सुरुवात सावंतवाडी येथून होणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी दिली आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून गॅस व इंधनाची दरवाढ आणि टंचाई, जिल्ह्यातील नशेली पदार्थांचे वाढते उत्पादन, तसेच अवैध मायनींग व माती उत्खननाचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. याशिवाय, सावंतवाडी मतदारसंघातील रस्ते, वीज आणि इतर नागरी सुविधांची झालेली दुरवस्था आणि याकडे स्थानिक आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केलेले दुर्लक्ष, त्यांच्या निष्क्रियतेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध केला जाणार आहे.
बुधवार, १० जून रोजी सकाळी ११:३० वाजता सावंतवाडी येथील मोती तलाव सर्कल ते प्रांत कार्यालय असा हा निषेध मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतर प्रांत कार्यालयासमोर निदर्शने करून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल. असे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी सांगितले.