भाजप-शिवसेना नगरसेवकांचा आक्रमक पवित्रा; नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी चौकशीचे दिले निर्देश
सावंतवाडी दि.१० ऑगस्ट
सावंतवाडी नगरपरिषद पाणी पुरवठा योजना बिलावरून मुख्याधिकारी यांना सत्ताधारी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांनी घेरले. दरम्यान नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांनी याबाबत चौकशी सुरू असून मुख्याधिकारी यांनी नगरसेवक व नागरिक यांच्या निवेदनावर योग्य भूमिका घेतली पाहिजे असे निर्देश दिले.
नळपाणी, गॅस पाईपलाईनच्या कामावेळी झालेल्या दुरुस्तीच १७ लाखांच बील काढण्यासाठी मुख्याधिकारी घाई का करत आहेत ? असा सवाल नगरसेवक देवा टेमकर यांनी केला. यावेळी पाणी पुरवठा समितीचे सदस्य म्हणून आम्हीही याच्या चौकशीच पत्र दिल असून अद्याप उत्तर का मिळाल नाही ? असा सवाल नगरसेविका शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी यांनी केला. तर आपण कोणत्याही प्रकारची घाई केलेली नसल्याचे सर्व प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिले. सावंतवाडी न.प.ची सर्वसाधारण सभा लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी लोकप्रतिनिधींनी मुख्याधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.
नगरसेवक श्री. टेमकर यांनी या मुद्द्याला हात घातला. त्यानंतर हा लोकांचा असून त्याबाबत आम्ही देखील पाणी पुरवठा समितीचे सदस्य म्हणून चौकशीच पत्र दिल्याचे सौ. धारगळकर, ॲड. दुभाषी यांनी सांगितले. यावर पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर म्हणाले, जोपर्यंत हिशोब दिला जात नाही तोवर बील काढलं जाणार नाही. तर या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी देव्या सुर्याजी यांनी केली. नगरसेवकांची पत्र कचऱ्याच्या पेटीत टाकली जात असल्याचा आरोप तौकरी शेख यांनी केला. तर नगरसेवक पत्र देतात त्याला उत्तर देण्याची पद्धत आहे की नाही ? असं उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी म्हटलं. योग्य अहवाल मागून बील अदा करण्यात येईल तसेच नगरसेवकांच्या पत्रांना तात्काळ उत्तर द्यावी असे आदेश नगराध्यक्षांनी काढले. यावेळी आपण कोणत्याही प्रकारची घाई करत नसून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी श्रीम. कांबळे यांनी याबाबतच्या खर्चाचा कार्यपुर्ती अहवाल आल्याशिवाय बील दिलं जाणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, क्रिडांगण आरक्षणाच्या जागेतून रस्ता देण्याबाबतच्या विषयावर संजू परब यांनी आक्षेप घेतला. झालेला ठराव पुन्हा घेता येतो का ? २० वर्षांपूर्वीचा विषय कसा घेतला गेला असा सवाल त्यांनी केला. यावेळी २०१९ साली यासंदर्भातील ठराव पुन्हा झाल्याचे सभापती आनंद नेवगींनी सांगितले. यावेळी प्रशासन तुम्हाला फसवत असून २०१९ ला ठराव झाल्याचा उल्लेख टीपणीत का नाही ? कायम चुकीचं काम प्रशासनाकडून होत आहे, प्रशासन टिपणी देताना वाचून देते की नाही ? असाही सवाल श्री. परब यांनी केला. तर उत्तर हे पिठासीन अधिकाऱ्यांनी किंवा मुख्याधिकारी यांनी द्याव सभापतींनी नको असंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, मी त्यांना बोलण्याची परवानगी दिली होती असं नगराध्यक्षा सौ. भोंसले यांनी सांगितले. तसेच पुढील बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी म्हटलं. यावेळी नळपाणी योजनेच्या अहवाल टिपणीत देताना इंग्रजीत दिल्याने संजू परब यांनी आक्षेप घेतला. आपलं कामकाज कोणत्या भाषेत चालत असा सवाल त्यांनी केला. तर इथे कितीजणांना इंग्रजी वाचता येत तेही ठावूक असल्याचा टोला हाणला.
दरम्यान, शहरातील खड्डे बुजविण्यात येताना पावसाळी डांबर योग्य वापरलं नाही. पहिल्याच पावसात ते वर आलं. तर चिरे टाकुन केलेलं काम योग्य नाही. तसेच माझ्या प्रभागातील एकही काम घेतलं जात नाही. ५ लाख रूपये सुद्धा माझ्या प्रभागात खर्च होत नाहीत. यावर देखील बोलायचं नसेल तुमचेच नगरसेवकच बोलणार असतील तर आम्ही सभेला यायचं तरी कशाला ? असा सवाल संजू परब यांनी केला. यावेळी आपणाला पत्र द्यावे असे नगराध्यक्षांनी सांगितले. आयत्यावेळीच्या विषयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच काम का रखडलं ? असा सवाल देवा टेमकर यांनी केला. यावर माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, मी नगराध्यक्ष असताना टेंडर काढलं, पहिल्याच बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला. साडेचार लाखांच कामही मंजूर झालं, ठेका दिला गेलाय. मग, सहा महिने कोणत्याही प्रकारच काम का झालं नाही ? असा सवाल त्यांनी मुख्याधिकारी यांना केला. तर पुतळ्याच्या वजनाबाबत कारण मुख्याधिकारी यांनी देत लवकरच यावर कार्यवाहीची ग्वाही दिली. तर सभापती आनंद नेवगी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मुद्दा मांडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठींचे धोरणात्मक निर्णय घेऊन काम होत नसेल तर यापेक्षा दुर्दैव नाही असं उपनगराध्यक्ष ॲड. निरवडेकर म्हणाले.
दरम्यान, आयत्यावेळीच्या विषयात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने सभेचे चित्रिकरण करण्यातबाबत किंवा प्रशासनाने ते पुरविण्याबाबतचा मुद्दा घेतला गेला. यावर आपण चित्रीकरणाबाबत नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले म्हणाल्या,सावंतवाडीची संस्कृती चुकीच्या पद्धतीने बाहेर जात आहे. सभागृहातील भांडण बाहेर जाणं हे संस्कृतीला शोभणार नसून सभा संपल्यानंतर सर्व सदस्य एकत्रच असतात. मात्र, केवळ वाद बाहेर जातो. चित्रीकरणाला परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे सभेच चित्रीकरण करण्यात येऊ नये असे आदेश नगराध्यक्षांनी दिले.
या सभेत शहरातील पार्किंग व्यवस्थापनाचा मुद्दा सभापती प्रतीक बांदेकर यांनी मांडला. तसेच खाजगी मालकीच्या जागेतील धोकादायक झाडांबाबत धोरण, अग्निशमन दलाच्या कामास मुदतवाढ आदींबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर, संजू परब, सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, निता सावंत-कविटकर, बाबू कुडतरकर, देव्या सुर्याजी, नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, वीणा जाधव, सुनिता पेडणेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, स्नेहा नाईक आदींसह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.