सावंतवाडी,दि.२२ जुलै
प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या आंबोली घाटात आणि धबधब्यांवर सुट्टीच्या दिवशी होणारी गर्दी, नियमबाह्य वाहन पार्किंग, मद्यपान करून होणारी हुल्लडबाजी आणि त्यामुळे निर्माण होणारी गंभीर वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सावंतवाडी पंचायत समितीने वन विभागाला दिले आहेत.
पंचायत समितीच्या १६ जुलै रोजी पार पडलेल्या मासिक सभेतील मायकल डिसोझा यांच्या सूचनेनुसार, गट विकास अधिकारी (सावंतवाडी) यांनी आंबोलीचे वन क्षेत्रपाल यांना याबाबतचे अधिकृत पत्र पाठवले आहे.
वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकतात: पावसाळ्यात आंबोलीत राज्य व परराज्यातून हजारो पर्यटक येतात. मात्र, अनेक पर्यटक पार्किंगचे नियम न पाळता रस्त्यातच वाहने उभी करतात. यामुळे लागणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकांसारखी तातडीची वाहने ३ ते ४ तास अडकून पडतात आणि रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
सुरक्षा व सुविधांचा अभाव: मद्यधुंद पर्यटकांकडून होणारी हुल्लडबाजी आणि भांडणांमुळे इतर पर्यटकांना त्रास होतो. पर्यटकांकडून कर वसुली केली जात असूनही योग्य सेवा व सुरक्षा मिळत नसल्याने पर्यटन स्थळाची बदनामी होत आहे. सद्यस्थितीत उपलब्ध असलेले पोलीस बळ अपुरे पडत असल्याचे पत्रात नमूद आहे.
विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी: आंबोली पर्यटन क्षेत्र हे वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वन विभागाने स्थानिक वन समितीमार्फत शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी मुख्य धबधब्यासह गर्दीच्या ठिकाणी कर्मचारी तैनात करावेत. गरज भासल्यास पोलिसांची मदत घेऊन हुल्लडबाजी व अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण मिळवावे.
याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समितीकडे तात्काळ सादर करावा, असे पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत माहितीसाठी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा यांनाही पाठवण्यात आली आहे.