सावंतवाडी : सामाजिक बांधिलकीसाठी समर्पित माणसांची गरज : शैलेश पै

शेअर करा

रवी जाधव, रूपा मुद्राळे, समीरा खलील, हेलन निब्रे व लक्ष्मण कदम सामाजिक कार्याचे स्तंभ

सावंतवाडी,दि.०८ सप्टेंबर

सामाजिक बांधिलकीला पैशांची नाही तर सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या माणसांची गरज आहे. रवी जाधव, रूपा मुद्राळे, समीरा खलील, हेलन निब्रे, लक्ष्मण कदम आदी या प्रतिष्ठानचे स्तंभ असून त्यांच्या सामाजिक कार्याला तोड नाही असे प्रतिपादन उद्योजक शैलेश पै यांनी केले. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडी शहर व हॉस्पिटल स्वच्छ ठेवणाऱ्या या स्वच्छता दूतांसाठी आरोग्य शिबिर व शिधावाटप तसेच 25 दिव्यांग मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.‌ यावेळी सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी मान्यवरांचा सन्मान देखील करण्यात आला. यामध्ये स्वच्छता दूत, गावातील कष्टकरी भाजी विक्रेत्या ज्येष्ठ महिला व दिव्यांग मुलं असे मिळून 145 जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी हे स्वच्छता दूत नाही तर देवदूत आहेत अशी भावना संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी संस्थेकडून डॉ. उमेश मसुरकर, डॉ. हर्ष सांगावकर, रानमाणूस प्रसाद गावडे, ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी, डॉ. विशाल रेड्डी, डॉ. महेश परूळेकर, साजीया पडवेकर, दीपक म्हापसेकर, विदीशा सावंत, द्रौपदी राऊळ, मंगेश सावंत, प्राजक्ता माळकर उर्फ जपा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. तसेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे डॉ. हर्ष सागावकर व त्यांची टीम मार्फत 95 स्वच्छता दुतांची मोफत आरोग्य शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी स्वखर्चाने इंजेक्शन व औषध-गोळ्या रुग्णांना दिल्या. तसेच महेश परुळेकर यांनीही विनामूल्य औषध पुरवली. याप्रसंगी अमेय पै, प्रा. सतीश बागवे, रूपाली पाटील, दीपक म्हापसेकर, संजय पेडणेकर, प्रा. सुभाष गोवेकर, डॉ. विशाल रेड्डी, शेखर सुभेदार, रवी जाधव, शरदिनी बागवे, हेलन निब्रे, रुपाली मुद्राळे, समिरा खलील, शाम निळेलकर, अशोक पेडणेकर, राजेंद्र बिर्जे, लक्ष्मण कदम, सूजय सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सतीश बागवे यांनी केले.‌ सूत्रसंचालन मेघना राऊळ तर आभार संजय पेडणेकर यांनी मानले.

शेअर करा