मासिक सभेत मंजूर ठरावानंतरही पाठपुरावा नसल्याचा आरोप; शहराच्या अस्मितेशी निगडित प्रकल्प हलक्यात घेतला जातोय का, असा सवाल
सावंतवाडी दि.१७ जून
सावंतवाडी शहराच्या अस्मितेचा प्रश्न असणारा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पावर न.प.च्या मासिक सभेत ठराव होऊनही तो पुढे नेण्यासाठी प्रशासनाकडून काहीच पाठपुरावा होत नसल्याने उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आज झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारत खडेबोल सुनावत घरचा अहेर दिला. तर हा प्रकल्प प्रशासनाकडून हलक्यात घेतला जातोय का ? याचे गांभीर्य तुम्हाला नाही का ? असा सवाल केला.
दरम्यान, विषय सुचीवरील ठरावाची प्रत सत्ताधाऱ्यांना वेगळी तर विरोधकांना वेगळी दिल्याने माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आक्रमक होत मुख्याधिकारी यांना जाब विचारला. वादग्रस्त ठरलेल्या ग्रो बीग टेक्नॉलॉजीच्या मुदतवाढीच्या ठरावावेळी हा प्रकार विरोधकांच्या लक्षात आला. तर विषय सुचीत एकुण ९ विषय असताना सत्ताधाऱ्यांकडे १० विषय असल्याचाही प्रकार सभागृहात समोर आला. या दोन्ही प्रकारावरून सभागृहात विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, वादग्रस्त ठरलेला त्या ग्रो बीग कंपनीच्या मुदतवाढीचा ठराव सभागृहात नामंजूर करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी केली.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक सभागृहात आज न.प.ची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी विविध विषयांवर सभागृहात चर्चा झाली. यात सुरूवातीलाच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी, नगराध्यक्षा विषयसुचीवर २० सह्या मारतात तर मुख्याधिकारी यांना सह्या मारायला अडचण काय ? असा सवाल करत आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही लोकांतून निवडून आलेले नगरसेवक आहोत. आम्हाला विषय सुचीची झेरॉक्स कशासाठी देता ? अशी विचारणा केली. यावेळी नगराध्यक्षांनी यापुढे अशी चूक होणार नाही असे स्पष्ट केले. तर शहरातील सांडपाणी व्यवस्थापन व पुर्नवापर प्रकल्पाबाबत तीन मासिक सभेत याबाबत ठराव घेतला असताना सावंतवाडीची अस्मिता असणाऱ्या या गोष्टीवर प्रशासनाकडून योग्य तो पाठपुरावा का झाला नाही ? असा सवाल उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी उपस्थित करत मुख्याधिकारी यांनी याबाबत उत्तर देण्याची मागणी केली. याप्रश्नी मुख्याधिकारी यांनी उत्तर देणे अपेक्षित असताना सत्ताधारी सभापती आनंद नेवगी व सुधीर आडिवरेकर यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी द्यावे, सभापतींनी नाही अशी सुचना संजू परब यांनी केली. यावेळी मुख्याधिकाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तर देत आपण शासनाने नेमलेल्या एजन्सीकडे संपर्क साधल्याचे सांगितले. यावेळी अधिकृत पत्रव्यवहार केले तर
ते सभागृहात सादर करा अशी सुचना उपनगराध्यक्षांनी केली. यावेळी फोनवरून चर्चा झाल्याचे सीओंनी सांगितले. त्यामुळे हा प्रकल्प प्रशासनाकडून हलक्यात घेतला जातोय का ? अशा शब्दांत उपनगराध्यक्षांनी खडेबोल सुनावले. तर नगरसेवक अजय गोंदावळे यांनी ही योजना सावंतवाडीसाठी फार महत्त्वाची असल्याचे सांगत ॲड. निरवडेकर यांना समर्थन दिले. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी हस्तक्षेप करत यावर गांभीर्याने विचार केला जाईल असे स्पष्ट केले.
तर बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीतील ठराव वाचनावरून शिवसेनेन आक्रमक पवित्रा घेतला. विषय सुचीवरील वाचनात आलेला मुद्द्यात आमच्याकडील माहिती वेगळी अन् सत्ताधारी या़ंच्याकडील वेगळी ? अस का ? असा सवाल संजू परब यांनी केला. याला शिवसेना नगरसेवकांनीही जोरदार आक्षेप नोंदवला. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर यांनी आपल्याला दिलेली टिपणी असून आपणही नगराध्यक्ष राहीला आहात असा टोला लगावला. यावेळी ज्ञानप्रबोधिनीत जुगार चालतो की मटका ? हे कळण्यासाठी आम्हालाही सविस्तर माहिती द्या, असे नगरसेवक देवा टेमकर यांनी सांगीतले. तर रोजगाराचा मुद्दा असल्याने मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केली. शर्वरी धारगळकर यांनी त्याला समर्थन करत न.प.च्या जागा स्थानिकांना वापरास द्याव्या अशी सुचना केली. मात्र, सत्ताधारी सभापती आनंद नेवगी व सुधीर आडीवरेकर यांनी विरोध करत या कंपनीच्या संचालकाकडून पत्रकार परिषद घेत नगरपरिषदेची बदनामी केली. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देऊ नये असे सांगितले. तर नगरसेवक तौकिर शेख यांनी या कंपनीच्या विरोधात मुद्दा उपस्थित करत भाडेतत्त्वावर घेतलेल्या खासगी मालमत्तेचे नुकसान या कंपनीने केल असून याबाबत जाब विचारणाऱ्यांवर ॲट्रोसीटी दाखल करत नंतर समझोता केला गेला. त्यामुळे संबंधितांना मुदतवाढ नको अशी भूमिका त्यांनी घेतली. यावेळी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी ठरावाबाबत हात उंचावून मतदान घ्यावे अशी सुचना केली. मात्र याकडे दुर्लक्ष करत या कंपनीला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे नगराध्यक्षांनी जाहीर केले.
दरम्यान, न.प.च्या २६ गुंठे जागेत पोस्ट खात्याकडून कुंपण घालण्यात आले असून ही जागा नगरपरिषदेन ताब्यात घ्यावी अशी मागणी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी केली. तर शहरातील भटक्या कुत्र्यांकडून वाढलेला उपद्रव बघता प्रशासनाने घोषणा केलेल्या शेल्टर प्रकल्पाचे काय केले ? लोकांकडून आमच्याकडे झालेल्या नुकसानीची भरपाई मागीतली जात आहे असा सवाल नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी केला. यावेळी मुख्याधिकारी यांनी दोन कोटीच्या प्रकल्पासाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव केला आहे. तसेच कुत्र्यांचा उपद्रव लक्षात घेता कुत्रे पकडणाऱ्यांची टीम वाढविण्यात येईल असे आश्वासीत केले. तर सावंतवाडी शहरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा यांची ओपिडी सुरू करण्यासाठी न.प. मार्फत जागा देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय आज सभागृहात सर्वानुमते घेण्यात आला. याबाबत नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी नगराध्यक्षांसह संपूर्ण सभागृहाचे अभिनंदन करत हा निर्णय शहरवासियांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचे सांगितले. तर आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचेही अभिनंदन केले. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर आदींसह सभापती, नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान, आयत्यावेळीच्या विषयात न.प.च्या उत्पन्नावरून विरोधी नगरसेवक संजू परब यांनी प्रशासनाला चांगलेच सुनावले. शिल्पग्राम प्रकल्प चालवण्यासाठी प्रशासनाने आकारलेली १ कोटी रूपयांची अनामत रक्कम १० वर्ष होऊनही अद्यापही संबंधिताकडून का वसूल केली गेली नाही ? असा सवाल उपस्थित करत न.प.चे उत्पन्न येथे बुडत नाही का ? असा सवाल केला. आपण नगराध्यक्ष असताना त्यांना नोटीस बजावली होती असे सांगत संबंधितांकडून पैसे व्याजासह वसूल करा वाटल्यास तीन महिन्यांची मुदत द्या असे स्पष्ट केले. यावर मुख्याधिकारी यांनी संबंधितांना तात्काळ नोटीस बजावण्यात येईल असे सांगितले. तर व्यापारी संकुलातील थकित भाड्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. नगराध्यक्षा या माझ्या प्रभागातील असून त्यांना निधीच्या बाबतीत प्रभागाला झुकत माप द्यावं अशी कोपरखळी देखील हाणली