सावंतवाडी: नायगावात भक्तगण आता पासूनच नायगावेश्वराच्या प्रतिक्षेत!

शेअर करा

सावंतवाडी,दि.०२ सप्टेंबर

अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचे आतापासूनच भाविकांना वेड लागलेले दिसते! अडीअडचणीच्या वेळी मदतीचा हात देणारा,नवसाला पावणारा आणि विभागातील गोरगरीब सामान्य लोकांना नव्याने जगण्या ची उमेद देणारा तारणहार,अशी भावना असलेल्या “नायगावेश्वर” (गणराया)च्या प्रतीक्षेत भाविक आतापासून अधिकच असलेले दिसतात!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे ९७ वे वर्ष आहे.शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या या “नायगाव संलग्न परिसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा मयुरी महालात गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी सभोवार सोनेरी हिरेजडीत मयुरांची सजावट करण्याचे काम रात्रंदिन जोरदारपणे सुरू आहे.त्यामध्ये नायगावेश्वराची सुंदर सुबकमूर्ती बसविण्यात येणार आहे.सजावटीवरील वारेमाप खर्च टाळून,उत्सवामागील मांगल्य कसे टिकून राहील,यावर उत्सव मंडळा कडून कटाक्ष ठेवण्यात आला आहे.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी समाजोध्दाराच्या महत उद्देशाने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेने शंभरी केव्हाच पार केली आहे. मुंबईतील अनेक गणेशोत्सव आज शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत.त्यामध्येच नायगाव येथील नायगावेश्वर गणेशोत्सवाचा समावेश होतो.वर्गणी अथवा देणगीद्वारे सार्वजनिक निधीचा अधिकाधिक संचय करून त्याचा विनियोग लोकोपयोगी कामावर करण्याचे उद्दिष्ट उत्सव मंडळाने आपल्या डोळ्यासमोर ठेवले आहे.

लोकमान्य टिळक यांनी मुंबईत १८९३ मध्ये गिरगावच्या केशवजी नाईक चाळीपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रथेला सुरूवात केली,असे इतिहासात नमूद आहे.

जेव्हा देश पारतंत्र्यात होता.तेव्हा सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आणि शिवजयंती उत्सौवाची परंपरा लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्याविषयी जनजागृती निर्माण व्हावी,या हेतूने सुरू केली.स्वातंत्र्यानंतर याची गरज संपली
आणि ही परंपरा बंद पडली असे झाले नाही.कारण “समाजोन्नत्ती” हा विषय जगाच्या अंतापर्यंत न संपणारा आहे.त्यामुळेच लसार्वजनिक उत्सवाची ही परंपरा सुरूच राहिली.नायगावेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने
ही थोर परंपरा गेली ९७ वर्षे कुठेही खंड पडू न देता सुरू ठेवली आहे.किंबहुना सार्वजनिक गणेशोत्सव मूळात भक्तीभावा बरोबरच समाजोन्नत्तीचे साधन असावे त्याचसाठी आहेत,हा विचार पुढे नेण्याचा संकल्प केला आहे!मंडळाचे अध्यक्ष अर्जुन गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस मयुरेश मोरे,खजिनदार विशाल पाटील, कार्याध्यक्ष सदीप नार्वेकर आदी पदाधिकारी सार्वजनिक गणेशोत्सव अधिक लोकाभिमुख हाण्याच्या द्रुष्टीने प्रयत्न करीत असताना दिसतात.
आणि मंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य त्यांच्या पाठीशी ठाम असलेले दिसतात,ही सर्वाधिक जमेची बाजू दिसते.सजावटीची प्रमुख जबाबदारी स्वप्नील शेट्ये पेलून नेत आहेत ●●●

शेअर करा