सावंतवाडी : जिल्हा धिकारी तृप्ती धोंडमिसे यांनी नेमळे गावातील कमी पावसामुळे नुकसान झालेल्या भात पिकाची केली पाहणी

शेअर करा

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची व पाणीपातळीची घेतली माहिती

सावंतवाडी,दि.२६ सप्टेंबर

जिल्ह्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने
तसेच पावसाची अनियमितता राहिल्यामुळे काही भागांमध्ये शेतीपिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पावसातील मोठा खंड आणि त्यानंतर जाणवलेली तीव्र उष्णता यामुळे भात पिकासह अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, विहिरींच्या पाणीपातळीतही घट होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावांला भेट देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमळे एरंडवाकवाडी येथील शेतकरी गोविंद दळवी यांच्या शेतांमध्ये जाऊन भात पिकाची सद्यस्थिती, पिकांची वाढ, पिकांना उपलब्ध असलेले पाणी तसेच पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. त्याचबरोबर परिसरातील ओहोळ पाणीपातळीचीही पाहणी करून शेतीसाठी उपलब्ध असलेल्या जलस्रोतांची स्थिती जाणून घेतली. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत पावसातील खंडामुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या. भात शेतीच्या ऐन वाढीच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने पिकांवर मोठा परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आता पाऊस पडून पिकांना याचा काहीच फायदा होणार नाही.काही ठिकाणी पिके करपण्याच्या स्थितीत असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाबरोबर वन्य प्राणी ही भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे नियोजनही विस्कळीत झाले असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

शेतीसाठी पाण्याची उपलब्धता हा देखील या काळात महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. पावसाअभावी ओहोळ विहिरींच्या पाणीपातळीत घट होत असून, त्याचा परिणाम शेतीच्या सिंचनाबरोबरच काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यावरही होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक पातळीवरील जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी काळातील पाण्याची गरज याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला . पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण जिल्ह्यातील शेतीपिके, पर्जन्यमान, जलस्रोतांची स्थिती तसेच पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी वाहून जाणारे पाणी जमिनीत जिरवून भुजंलातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जलतारा अभियाना चा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, उपविभागीय अधिकारी विर सिंग वसावे मंडल अधिकारी,नलावडे नायब तहसीलदार गावडे उपविभागीय कृषी अधिकारी अनिकेत कदम, तालुका कृषी अधिकारी गोरे, मंडळ कृषी अधिकारी मनोज देवकर, उप कृषी अधिकारी गवाणे, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, मृदा आणि जलसंधारण विभागाचे कर्यकारी अधिकारी अभियंता शिरोडकर, B D O जाधव नेमळे सरपंच दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, ग्रामसेवक चौहान, पोलीस पाटील रमेश नेमळेकर तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा