​सावंतवाडी : अटल प्रतिष्ठानतर्फे सावंतवाडीत जिल्हास्तरीय संस्कृत स्पर्धा

शेअर करा

​सावंतवाडी,दि.१२ ऑगस्ट
संस्कृत भाषेचा प्रचार व संवर्धनासाठी अटल प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री. पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय संस्कृत भाषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अमुल पावसकर व कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रिज असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर यांनी आपले वडील स्व. महादेव उर्फ भास्कर नारायण पावसकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा प्रायोजित केल्या आहेत.
​ही स्पर्धा तीन गटांत होणार आहे. यामध्ये इयत्ता ५ वी ते ६ वी – गणपती स्तोत्र पाठांतर, इयत्ता ७ वी ते ८ वी – गीत गायन, तर इयत्ता ९ वी ते १० वी – कथाकथन स्पर्धा घेतली जाईल. विजेत्यांना बांबूपासून बनवलेली आकर्षक स्मृतीचिन्हे व सर्व सहभागींना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
​स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील शाळांनी २५ ऑगस्ट २०२६ पूर्वी कु. ज्योती राऊळ (मोबा. ९४०४७५६८९५) यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. नकुल पार्सेकर व कार्यवाह रघुनाथ तानावडे यांनी केले आहे.

शेअर करा