सावंतवाडी : पाऊसाची वाट पाहत बसू नका तर पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला सुरुवात करा तर दुष्काळी परिस्थिती वर मात करता येईल

शेअर करा

सावंतवाडी दि.२८ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाचा मोठा तुटवडा भासत आहे. यापुढे पावसाचा अंदाज नाही. हवामान खात्याने पाऊस परतीच्या वाटेवर असल्याचे म्हटले आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत पर्जन्यमानात १,४९० मि.मी.ने घट झाली आहे. त्यामुळे गावागावांत नदी, नाले, ओढ्यात पाणी असेपर्यंत तो अडवून ठेवणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थिती वर मात करताना पाणी टंचाई जाणवणार नाही यासाठी प्रयत्न करत असताना पाणी अडवून जमिनीत मुरवीले पाहिजे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसाने जोरदार दांडी मारल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवा, उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे (ता. कुडाळ) यांनी दिलेल्या अहवालानुसार, यंदा १ जानेवारी ते २८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात केवळ २,१८७.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ३,६७७.४ मि.मी. पाऊस पडला होता. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल १,४९०.४ मि.मी. कमी पाऊस झाला आहे.
​पावसातील या मोठ्या घटीसोबतच जिल्ह्यातील तापमानातही वाढ झाली आहे. गतवर्षी २८ सप्टेंबर रोजी कमाल तापमान २९.० अंश सेल्सिअस होते, तर यंदा ते ३४.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. उन्हाचा चटका आणि बाष्पीभवनाचा वाढलेला वेग यामुळे जमिनीतील ओलावा वेगाने कमी होत असून भात पिकावर तसेच आंबा व काजू बागांवर याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
​या पार्श्वभूमीवर कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना पिकांना संरक्षित पाणी देण्याचा, बागायतींमध्ये पालापाचोळ्याचे आच्छादन (मल्चिंग) करण्याचा आणि उपलब्ध पाण्याचा साठा विचारात घेऊनच रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी यांनी जनतेला आवाहन केले आहे की,​परतीचा पाऊस अजून होणे बाकी असून, त्याआधीच पावसाचे पाणी साठवण्यासाठी पूर्वतयारी करण्याचे महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. दगड, गवत आणि लाकडांचा वापर करून योग्य ठिकाणी छोटे बंधारे उभारल्यास परतीच्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर अडवता येणे शक्य होणार आहे.
​बंधारे बांधण्याचे मुख्य फायदे:
अडवलेले पाणी थेट जमिनीत मुरण्यास मदत होईल. भूजल पातळी वाढल्यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी वाढेल.शेतजमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.जमिनीत पाझरणाऱ्या पाण्यामुळे भूजल साठ्यात मोठी वाढ होईल.उन्हाळ्यातील दुष्काळावर मात: पुढील उन्हाळ्यासाठी पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध होऊन परिसर दुष्काळमुक्त होण्यास मदत होईल.
​बंधारे कसे बांधायचे?
प्रवाहाच्या ठिकाणी योग्य पद्धतीने दगड रचून पाया तयार करणे. दगडांच्या रचनेला आधार देण्यासाठी लाकडांचे ओंडके व फांद्या वापरणे. पाणी पाझरून वाहून जाऊ नये म्हणून गवत आणि मातीचा थर देऊन बंधारा मजबूत करणे.
​लोकसहभागातून मोहीम राबवण्याचे आवाहन:
​प्रत्येक वाडी किंवा वस्तीतील ५ ते १० नागरिक एकत्र आले, तर आपल्या भागातील योग्य ठिकाणी असे शेकडो छोटे बंधारे सहज उभारता येतील. अशा मोहिमांमुळे समुद्रात किंवा नदीत वाहून जाणारे मोलाचे पाणी गावातच अडवले जाऊ शकते.
​”परतीच्या पावसाची वाट पाहू नका… त्याआधी पूर्वतयारी करूया!” असा संदेश देत नागरिकांना जलसंधारणाच्या या कार्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. दरवर्षी ढगफुटी सारखा किंवा अवकाळी पाऊस पडतो. पण एल नेनो मुळे पाऊस झाला नाही तर असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे आतापासूनच प्रत्येक गावात पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला सुरुवात झाली पाहिजे असे आवाहन फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी केले आहे.

शेअर करा