Sawantwadi : सावंतवाडीत २५ ऑक्टोबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती परिषद

शेअर करा

ऐतिहासिक सावंतवाडी भेटीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीतर्फे विशेष परिषद व विविध कार्यक्रमांचे आयोजन

​सावंतवाडी,दि.२२ ऑक्टोबर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सावंतवाडी भेटीच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी ‘समता प्रेरणाभूमी संवर्धन समिती’ सावंतवाडी यांच्या वतीने रविवार, दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथे विशेष ‘स्मृती परिषद’ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम समता प्रेरणाभूमी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान), सावंतवाडी येथे पार पडणार आहे.
​ऐतिहासिक पार्श्वभूमी:
​तत्कालीन सावंतवाडी संस्थानातील पडवे-गवसे येथील जमीनदार खोत खून प्रकरणाच्या अपिलाची सुनावणी सावंतवाडी न्यायालयात सुरु होती. या प्रकरणी पक्षकार यांच्या बाजूने न्यायालयात कामकाज पाहण्यासाठी २२ ऑक्टोबर १९३२ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडीत आले होते. त्यावेळच्या अस्पृश्य समाजाने डॉ. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक सावंतवाडी भेटीला ९४ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या स्मृती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
​कार्यक्रमाची रूपरेषा:
​उद्घाटन सत्र: सकाळी ११.०० ते दुपारी १.००
​अल्पोपहार: दुपारी १.०० ते २.००
​प्रबोधन सत्र: दुपारी २.०० ते ३.००
​विषय: ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुक्तीसंग्रामाचा पाठपुरावा आणि परिवाराचे सांस्कृतिक राजकारण’
​वक्ते: धम्मसंगिनी रमा गोरख, नागपूर
​सांस्कृतिक कार्यक्रम: दुपारी ३.०० ते ४.००
​समारोप सत्र
​प्रमुख उपस्थिती व निमंत्रित:
​या परिषदेचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ श्रद्धाराजे सावंत भोसले आणि उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष डि. के. पडेलकर आणि मुख्याधिकारी विनायक वि. औंधकर असणार आहेत.
​याशिवाय कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, आणि पदाधिकारी सन्माननीय उपस्थित म्हणून लाभणार आहेत.
​या ऐतिहासिक स्मृती परिषदेला नागरिकांनी व भीमप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक मोहन जाधव आणि ‘समता प्रेरणाभूमी संवर्धन समिती, सावंतवाडी’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा