सावंतवाडी,दि.२४ सप्टेंबर
मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी ग्रामपंचायतींना ई-कचरा संकलनाचे स्पष्ट आदेश दिलेले असताना, माडखोल ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली ई-कचरा संकलन गाडीच पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वराज्य दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष श्री. स्वप्निल लातीये यांनी हा गंभीर आरोप करत, याप्रकरणी संबंधित सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.वर्ष २०२३ मध्ये माडखोल ग्रामपंचायतीने आपल्या अर्थसंकल्पातून ई-कचरा संकलनासाठी लाखो रुपये खर्च करून विशेष वाहनाची खरेदी केली होती. मात्र, खरेदीनंतर ग्रामपंचायतीने या वाहनाची कोणतीही योग्य देखभाल केली नाही. हे वाहन अत्यंत निष्काळजीपणे बेवारस स्थितीत सोडून देण्यात आले होते आणि आता त्या जागेवरून ही गाडीच चोरीला गेली आहे, असा थेट आरोप लातीये यांनी केला आहे.या सर्व प्रकाराला माडखोलचे सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक पूर्णपणे जबाबदार आहेत. या गैरकारभाराविरोधात राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री श्री. योगेश कदम यांच्याकडे पत्राद्वारे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे श्री. स्वप्निल लातीये यांनी स्पष्ट केले.या प्रकरणात सरपंच आणि निवृत्त ग्रामसेवक यांचा थेट हात असल्याचा संशय व्यक्त करत, “सरपंचांचे मानधन आणि संबंधित निवृत्त ग्रामसेवकाचे निवृत्तीवेतन पुढील दोन वर्षांसाठी तात्काळ स्थगित करण्यात यावे,” अशी मागणी लातीये यांनी केली आहे.लाखो रुपयांच्या सरकारी निधीचा अपव्यय करून ई-कचरा गाडी बेवारस सोडणे आणि ती गायब होणे, या प्रकारामुळे माडखोल परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.फोटो स्वप्नील लातये यांनी गाडी सोडून देण्यात आली असल्याचा फोटो उपलब्ध करून दिला आहे ती गाडी