सह्याद्री कृषी पर्यटन संस्थेचा पुढाकार; नवीन व्यावसायिकांसाठी कार्यशाळा व मार्गदर्शनाचे नियोजन
सावंतवाडी दि.१८ जुलै
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला नवी गती देण्यासाठी आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. नवीन पर्यटन धोरण आणि योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी भविष्यात विशेष पर्यटन कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन केले जाईल, अशी ग्वाही कोकण विभागीय पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी दिली.
सावंत फार्म ॲग्रो टुरिझम, कुणकेरी (ता. सावंतवाडी) येथे सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्था, सावंतवाडी यांच्या माध्यमातून शुक्रवारी एका अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर यांच्यासोबत जिल्ह्यातील पर्यटन सुविधा, अडचणी आणि नव्या प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
व्यावसायिकांच्या समस्यांवर थेट चर्चा:
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असला, तरी स्थानिक व्यावसायिकांना अनेक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बैठकीत प्रामुख्याने निवास-न्याहारी (होम स्टे) आणि कृषी पर्यटनाशी निगडित असलेल्या विविध परवानग्या, करांमधील सवलती आणि शासनाकडून मिळणाऱ्या सुविधांमधील अडचणी उपसंचालकांसमोर थेट मांडण्यात आल्या. यावर बोलताना डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी स्पष्ट केले की, जास्त लाभार्थी असल्यास भविष्यात एकत्रित कार्यशाळा घेऊन सर्व शंकांचे निरसन केले जाईल.
’होम स्टे’ आणि नव्या प्रस्तावांना ऑनलाईन मंजुरी देण्याची मागणी
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग पर्यटन व्यवसायाकडे वळत आहे. ग्रामीण भागात ‘निवास न्याहारी योजना’ (Home Stay) आणि ‘कृषी पर्यटन केंद्र’ सुरू करण्यासाठी अनेक नवीन प्रस्ताव सादर केले जात आहेत. हे सर्व प्रस्ताव विहित वेळेत मंजूर व्हावेत, जेणेकरून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला वेग येईल, अशी आग्रही मागणी सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावर उपसंचालकांनी हे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन करत योग्य ते मार्गदर्शन केले.
”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न होत आहेत. या बैठकीच्या माध्यमातून प्रलंबित असणारे तसेच नव्याने येणारे सर्व कायदेशीर प्रस्ताव जलद गतीने मंजूर करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.” असे डॉ. प्रज्ञा मनोहर पर्यटन उपसंचालक, कोकण विभाग यांनी सांगितले.
कुणकेरी येथील या महत्त्वपूर्ण बैठकीला सह्याद्री कृषी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष रामानंद शिरोडकर, उपाध्यक्ष प्रमोद सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, सौ. दिव्या वायंगणकर, सौ विभावरी संदीप सुकी, जोश कन्नई, बाबुराव कविटकर, सुहास देसाई, देवेंद्र टेमकर, अनंत घोगले, रूपेश धरणे, नरेंद्र तारी, शाम कासार, पराशर सावंत, विराज घोगळे, धर्माजी घोगळे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पर्यटनप्रेमी, उद्योजक आणि नवीन पर्यटन व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
होम स्टे आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी व पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी ही बैठक अत्यंत मोलाची ठरल्याचे सह्याद्री संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.