ललित साहित्याविषयी उदासीनता असतानाही मुलांचा उत्साह प्रेरणादायी; साहित्यिक उपक्रमांमध्ये पालकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन आजगाव साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांचे.
सावंतवाडी,दि.२७ जुलै
‘ललित साहित्याविषयीच्या उदासीन काळात साहित्यविषयक कार्यक्रमात मुले उत्साहाने सहभाग घेतात, ही आनंददायी बाब आहे. असे कार्यक्रम सातत्याने व्हायला हवेत आणि त्यात पालकांनीही सहभाग घ्यायला हवा’, असे मत आजगाव साहित्य कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यानी व्यक्त केले. निमित्त होते ‘कोवळे शब्द माझे’ या कार्यक्रमाचे.
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा मासिक सलग ६९ वा कार्यक्रम र.ग. खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगातून शिरोडा येथे संपन्न झाला. या ‘कोवळे शब्द माझे’ कार्यक्रमात १८ मुलांनी सादरीकरण करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
सर्वप्रथम ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले,तर प्रास्ताविक विनय सौदागर यांनी केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली.
सर्वप्रथम चिन्मयी जोशी हिने अरुण कोल्हटकर व विंदा करंदीकर यांच्या कविता सादर केल्या. नंतर प्रांजल आरोलकर हिने वसंत कानेटकर रचित एक भूपाळी सादर केली.त्यापुढे चिन्मयी पालयेकर हिने बिरबलाची चातुर्यकथा, मनवा सोन्सुरकरने कथा, नेहल मळगावकरने शिवाजीराजें विषयीची कविता, काव्या धानजी हिने उबंटु चित्रपटातील प्रार्थना व गौरवी नाईक हिने झुळझुळू ही कविता सादर केली. दीपिका बागकर व अन्वी कोंबे यानी कविता, प्रज्वल मेस्त्री याने अभंग आणि सृष्टी डोंगरे हिने गोष्ट सादर केली. आरवलीतील या मुलांच्या सादरीकरणाचे सूत्रसंचालन नम्रता राय यानी केले.
त्यानंतर मैथिली शिरगावकर हिने विंदा करंदीकर यांची कविता, तर चैतन्य यादव याने हिंदीतून कथा सादर केली. अदीबा शेख हिने ‘कैसा कैसा खाना’ या पुस्तकाचा परिचय करून दिला. रुखसार खान आणि इकराय शेख यांनी चारोळ्या सादर केल्या. गार्गी पडवळ हिने पुस्तक व पुस्तकातील नायिका यांचा संवाद सादरीकरणाचा अनोखा प्रयोग सादर केला. शिरोड्यातील या मुलांच्या सादरीकरणाचे सूत्रसंचालन अश्विनी पडवळ यांनी केले.
त्यानंतर आराध्या लोहगाव हिने एक कविता सादर केली, तर प्रचिती शेटयेच्या ‘नातं मैत्रीचं ‘ या स्वरचित कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. ग्रंथपाल प्राची पालयेकर यांचे सहाय्याने सर्व मुलांना प्रमाणपत्र व एक वही भेट देण्यात आली.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून शेखर पणशीकर यानी एक अभंग सादर केला. शेवटी ग्रंथालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीराम दीक्षित यानी आभार मानले. कार्यक्रमाची ध्वनीव्यवस्था श्रद्धा राऊळ हिने सांभाळली, तर छायाचित्रण दिलीप पांढरे यानी केले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, लिना परब, भालचंद्र दीक्षित, रामचंद्र बेहेरे, एकनाथ शेटकर, सरोज रेडकर, सोमा गावडे, जयदीप देशपांडे, प्रकाश मिशाळ, राजेंद्र गोसावी, स्नेहा नारींगणेकर, अविनाश जोशी, अनिता सौदागर, रवींद्र पणशीकर, कमलेश अणावकर,वैभवी रायशिरोडकर तसेच आरवली देवस्थाने अध्यक्ष जयवंत राय आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.