सावंतवाडी दि.५ सप्टेंबर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू असून, येत्या काही दिवसांत घरोघरी मुंबईकर आप्तेष्ट दाखल होतील. मात्र, या आनंदोत्सवाच्या काळातच जिल्ह्यातील जैवविविधता आणि निसर्गसमृद्धी टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलणे गरजेचे आहे. केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केलेल्या इको सेन्सिटिव्ह एरिया (ESA) संदर्भातील ७ व्या अधिसूचनेवर हरकती नोंदवण्यासाठी २५ सप्टेंबर २०२६ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील सुजाण नागरिकांनी तातडीने ईमेलद्वारे आपल्या हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन पर्यावरणप्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे.
दोडामार्ग तालुक्याला वगळल्याने आश्चर्य:
केंद्र सरकारच्या या नव्या अधिसूचनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९१ गावांचा इको सेन्सिटिव्ह एरिया म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, ‘अॅमेझॉन ऑफ महाराष्ट्र’ म्हणून ओळखला जाणारा संपूर्ण दोडामार्ग तालुकाच या यादीतून वगळण्यात आला आहे. डॉ. माधव गाडगीळ समितीच्या अहवालानुसार हा प्रदेश अतिसंवेदनशील (ESZ 1) जैवविविधतेचा अविभाज्य भाग आहे. असा महत्त्वपूर्ण तालुकाच यादीतून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून, दोडामार्ग मधील गावांचा यात समावेश करण्याची मागणी नागरिकांनी लावून धरली पाहिजे, असे डॉ. परुळेकर यांनी स्पष्ट केले.
६०० ते ७०० देवरायांना सुरक्षेची गरज:
सिंधुदुर्गात पूर्वजांनी शेकडो वर्षे जपलेल्या अंदाजे ६०० ते ७०० देवराया (Sacred Groves) आहेत. या निसर्गदत्त देवरायांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी १० चौ. किमी खालील क्षेत्रातील देवरायांना स्वतंत्रपणे ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर करण्यात यावे, अशी मागणी हरकती नोंदवताना प्रामुख्याने करावी.
ईमेलद्वारे नोंदवा हरकती:
जिल्ह्यातील निसर्ग, जंगल आणि देवराया वाचवण्यासाठी सर्व सुजाण नागरिकांनी, संस्थांनी व पर्यावरणप्रेमींनी [email protected] या ईमेल आयडीवर २५ सप्टेंबर २०२६ पूर्वी आपल्या हरकती व सूचना पाठवून या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे.