९० लाखांच्या रस्ता डांबरीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू
सावंतवाडी,दि.२२ ऑक्टोंबर
सावंतवाडी शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी आणि रस्त्यांची दुरुस्ती होण्यासाठी अजूनही सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील श्रीराम वाचन मंदिर ते शिव उद्यान या मार्गाच्या डांबरीकरणासाठी ९० लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी दोन महिने लागणार असून, त्यानंतरच संबंधित खड्डे बुजवले जाणार आहेत.
सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. श्रीराम वाचन मंदिर ते शिव उद्यान दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला असून, त्यासाठी ९० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, तसेच तोपर्यंत शहरातील इतर खड्डे बुजवून घेण्यासाठीही पालिका पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे औंधकर यांनी स्पष्ट केले.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात साईडपट्टीची कामे पूर्ण होणार:
दरम्यान, शहरात गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असून, त्यापोटी सुमारे साडेसहा कोटी रुपये नगरपालिकेकडे जमा झाले आहेत. या कामामुळे रस्त्यांच्या कडेला झालेल्या खोदकामाची व साईडपट्टीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गॅस पाइपलाइनसाठी उकरण्यात आलेल्या सर्व रस्त्यांच्या साईडपट्टी दुरुस्तीचे काम नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. राऊळ यांनी दिली.
याशिवाय, शहरात पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे तेथे, त्या भागातील साईडपट्टी दुरुस्तीचे काम लवकरच मार्गी लावले जाईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.