सावंतवाडी : अंडाशयाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मैनाबाई लाखे यांना मदतीची गरज

शेअर करा

बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू; आर्थिक अडचणींमुळे उपचारांवर संकट, जिल्हावासीयांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन

सावंतवाडी,दि.०५ जुन

सावंतवाडी जिमखाना येथील सौ मैनाबाई रघुनाथ लाखे (६०) या दुर्धर अशा अंडाशयाच्या (ओव्हरी) कर्करोगाने गेले तीन महिने आजारी असून त्यांच्यावर बेळगाव केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या लाखे कुटुंबीयांवर पैशाअभावी उपचार थांबवण्याची वेळ आली आहे. तिच्या उपचारासाठी लाखे कुटुंबीयांनी आपल्याकडील होते नव्हते ते सर्व संपवले. त्यामुळे तिच्या पुढील उपचारासाठी लाखे कुटुंबीयांनी जिल्हावासीयांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तींना मदतीसाठी आवाहन केले आहे.
सौ मैनाबाई लाखे यांना सुरुवातीला पोटदुखीचा व अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबोळी रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी त्यांना अंडाशयाच्या (ओव्हरी) कर्करोगाने ग्रासले असल्याचे स्पष्ट झाले. हे समजताच लाखे कुटुंबीय अक्षरशः कोलमडून पडले. त्यानंतर गेल्या मार्च महिन्यापासून त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी त्यांना दर महिना केमो व इतर औषध उपचारासाठी सुमारे पाऊण लाखाचा खर्च येत आहे.
आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या लाखे कुटुंबात जमीन अथवा शेतीसह अन्य उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे लाखे कुटुंबीयांची घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची. त्यामुळे कर्करोगावरील या उपचाराचा लाखो रुपयाचा खर्च ऐकून लाखे कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न लाखे कुटुंबीयांना सतावत आहे.
लाखे कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या पुढील औषध उपचाराच्या लाखो रुपयांच्या खर्चाचा प्रश्न कायम आहे. अतिशय दुर्धर असलेल्या या आजाराची मैनाबाई लाखे यांना माहिती आहे. मात्र स्वतःला सावरत त्या अजूनही खचलेल्या नाहीत. आपले पूर्वीचे जीवन जगण्याची तिची इच्छा आहे. आतापर्यंत त्यांच्या उपचारासाठी लाखे कुटुंबियांनी गेले तीन महिने आपल्याकडील होते नव्हते ते सर्व संपवले. पर्यायाने लाखे कुटुंबीयांची सध्याची स्थिती पाहिल्यावर कुणालाही गहिवरून येईल. त्यामुळे लाखे कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील हास्य पुन्हा फुलविण्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या आधारासाठी सर्व समाजमनाच्या दातृत्वाची गरज आहे. ही तातडीची मदत त्या माय माऊलीला नवसंजीवनी देऊ शकणार असून त्यामुळे एका कुटुंबाचा आधारही वाचणार आहे.
मैनाबाई लाखे यांच्यावर सध्या बेळगाव केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र औषध उपचारासाठी सुमारे पाच लाख रुपयांची गरज आहे. लाखे कुटुंबीयांनी जिल्हावासीयांना मदतीसाठी हाक दिली आहे. ज्यांना बहिणाबाई रघुनाथ लाखे यांच्या पुढील उपचारासाठी मदत करावयाची आहे त्यांनी तिचा मुलगा राकेश रघुनाथ लाखे, खाते नंबर -3777020 10105422 आय एफ एस सी कोड – यू बी आय एन 0537772 युनियन बैंक ऑफ इंडिया, शाखा – सावंतवाडी या खात्यावर जमा करावी. तसेच गुगल पे नंबर 8806318029 यावरही मदत देऊ शकता. आणि अधिक माहितीसाठी 8806318029 या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन लाखे कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आले आहे.

शेअर करा