आंब्याच्या झाडावरून पडून गंभीर जखमी; गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
सावंतवाडी,दि.१० जून
ओटवणे – शेरवाळेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रसिद्ध सुतार कारागीर आणि गिरणी कामगार महादेव उर्फ जीजी अनंत मयेकर (वय ७४) यांचे मंगळवारी सकाळी गोवा – बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. रविवार, ७ जून रोजी दुपारी आंब्याच्या झाडावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या निधनाने ओटवणे परिसरावर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जीजी मयेकर हे रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे कामासाठी आंब्याच्या झाडावर चढले होते. मात्र, अचानक पाय घसरल्याने ते झाडावरून खाली पडले. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्यासह पाठीला, मणक्याला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती.
अपघात घडताच त्यांना तातडीने सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना तातडीने गोवा – बांबोळी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यानच मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
गिरणी कामगार असलेले स्व. जीजी मयेकर हे केवळ एक कुशल सुतार कारागीर व माजी लोकप्रतिनिधी नव्हते, तर त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय योगदान दिले होते. ते शेरवाळेवाडी येथील ‘शेष साक्षात्कर सेवा समिती’चे पदाधिकारी होते. याशिवाय स्थानिक ‘रवळनाथ वाचनालय’ आणि ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती’चेही त्यांनी पदाधिकारी म्हणून दीर्घकाळ काम पाहिले होते. त्यांच्या जाण्याने स्थानिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
ते येथील उमेश मयेकर आणि कृष्णकांत (बंड्या) मयेकर यांचे वडील, तर सुनील मयेकर यांचे भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, भाऊ, भावजय, पुतणे आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल ओटवणे व सावंतवाडी परिसरातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.