सावंतवाडी,दि.०६ जुन
गोव्यामध्ये पर्यटनाचा आनंद घेऊन रत्नागिरीला परतणाऱ्या पर्यटकांच्या कारला न्हावेली येथे एका गव्याने जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात कारच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कारचालक आणि गाडीतील इतर कुटुंबीय या अपघातातून सुरक्षित बचावले असून एक मोठी दुर्घटना टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील एक कुटुंब कारने गोव्यात पर्यटनासाठी गेले होते. गोव्याहून परतत असताना न्हावेली परिसरात अचानक एक गवा धावत रस्त्यावर आला आणि त्याने चालत्या कारला थेट जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की गाडीच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गाडीतील पर्यटक कुटुंब प्रचंड घाबरले होते, मात्र सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.
हा अपघात घडला त्याच वेळी तिथून शिरोड्याच्या दिशेने जाणारे कारचालक सुधाकर रेडकर यांनी तत्परता दाखवत या घटनेची माहिती तातडीने वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.