सावंतवाडी, दि. ८ जून :
सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेला सावंतवाडी तालुक्यातील असनिये ते घारपी रस्ता पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात अत्यंत धोकादायक बनला आहे. रस्त्याला मजबूत साईडपट्ट्या नसल्यामुळे पहिल्याच पावसात माती वाहून रस्त्यावर आली आहे. यामुळे येथील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून, ग्रामस्थ, व्यावसायिक आणि शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी आणि संबंधित ठेकेदाराने याची तात्काळ दखल घेऊन साईडपट्ट्या मजबूत कराव्यात, अशी जोरदार मागणी घारपी ग्रामस्थांनी केली आहे.
५ कोटींचा खर्च, मात्र रस्त्याची दुरवस्था:
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत असनियेच्या सीमेपासून ते घारपी गावापर्यंत सुमारे चार किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. यासाठी शासनाचा सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र, पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात या रस्त्याशेजारील मातीच्या साईडपट्ट्या वाहून गेल्या असून, सर्व माती मुख्य रस्त्यावर पसरली आहे. यामुळे हा संपूर्ण रस्ता निसरडा आणि वाहतुकीस अयोग्य बनला आहे.
एसटी वाहतूक ठप्प; विद्यार्थ्यांची गैरसोय:
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील प्रवासी वाहतुकीचे एकमेव साधन असलेली एसटी बस सेवा सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. याचा मोठा फटका बांदा बाजारपेठेत विविध कामांसाठी जाणाऱ्या घारपीवासियांना बसत आहे. शाळा पुढील आठवड्यात सुरू होत असून, माध्यमिक शिक्षणासाठी असनिये गावात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही यामुळे मोठी गैरसोय होणार आहे.
अरुंद रस्ता आणि अपघाताची भीती:
लाखो रुपये खर्च करूनही हा काँक्रिटचा रस्ता अत्यंत अरुंद ठेवण्यात आला आहे. साईडपट्ट्या कच्च्या आणि धोकादायक असल्याने समोरासमोरून येणारी दोन चारचाकी वाहने एकाच वेळी या रस्त्यावरून पास होऊ शकत नाहीत. वाहन बाजूला घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा दुचाकी साईडपट्टीवर उतरल्यास ती घसरून थेट अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
“घारपी गावात जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. जर मान्सूनपूर्व पावसातच या रस्त्याची अशी दुरवस्था झाली असेल, तर ऐन पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होईल. सध्या रस्त्यावर आलेल्या मातीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.” अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
गावात उद्भवलेली ही बिकट परिस्थिती पाहता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबंधित अधिकारी वर्गाने आणि ठेकेदाराने या समस्येची तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. पावसाळा तीव्र होण्यापूर्वी या रस्त्याच्या साईडपट्ट्या मुरूम किंवा दगड टाकून मजबूत कराव्यात आणि रस्ता वाहतुकीस पूर्ववत करून घारपीवासियांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.