विनापरवाना दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; रत्नागिरी जिल्ह्यातील संशयित ताब्यात, टेम्पो ट्रॅव्हलरसह दारू जप्त.
सावंतवाडी, दि. २२ जून
गोवा बनावटीच्या दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका इसमावर सावंतवाडी पोलिसांकडून सातार्डा चेकपोस्ट येथे मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयित आरोपीकडून टेम्पो ट्रॅव्हलर आणि दारू असा एकूण १५ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातार्डा चेकपोस्ट येथे तपासणी सुरू असताना, संशयित आरोपी जितेंद्र प्रवीण मयेकर (रा. अडूर, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलर (क्र. MH 08 BK 8181) या वाहनातून गोव्याहून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. पोलिसांनी या वाहनाची झडती घेतली असता, त्यात सुमारे ४० हजार ७०० रुपये किमतीची गोवा बनावटीची विविध ब्रँडची दारू रविवारी आढळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कारवाईदरम्यान ४०,७०० रुपयांची दारू आणि १५ लाख रुपये किमतीची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी असा एकूण १५,४०,७०० रुपयांचा मुद्देमाल रविवारी जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल बर्गे यांच्या पथकाने केली.