सावंतवाडी : सहकारी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर शासन सकारात्मक; महत्त्वाच्या बैठकीत तातडीच्या निर्णयांचे आश्वासन

शेअर करा

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; सहकार भारतीने मांडलेल्या मागण्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद, काही निर्णय तत्काळ मंजूर.

सावंतवाडी,दि.२२ जुलै
राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी क्षेत्रातील विविध धोरणात्मक विषयांवर नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस सहकार सचिव प्रविण दराडे, सहकार आयुक्त दिपक तावरे आणि अप्पर सचिव संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
​या बैठकीमध्ये सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी सहकारी पतसंस्थांचे विविध महत्त्वाचे प्रश्न शासनासमोर मांडले. त्यावर सहकार मंत्री आणि उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अनेक विषयांवर त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. काही मागण्यांवर तात्काळ निर्णयही घेण्यात आले.
​पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षण देण्याबाबत राज्य शासन स्तरावर वेगाने पावले उचलली जात आहेत. संस्थांना द्याव्या लागणाऱ्या प्रति ठेवीवरील रु. १०० साठी १० पैसे दराच्या निश्चितीबाबत विविध स्तरांवर बैठका होत आहेत. यातच नव्याने पतसंस्थांचे अ, ब, क अशा वर्गवारीनुसार वर्गीकरण करून ठेव संरक्षण अंशदानाचे दर निश्चित करण्यावर बैठकीत चर्चा झाली. लागू करण्यात आलेल्या अंशदान प्रणालीवर फेरविचार करून ती ‘रिस्क बेस्ड प्रीमियम’ (Risk Based Premium) पद्धतीने लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असून संस्थांच्या वर्गवारीनुसार अंशदान निश्चित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले.
​पतसंस्थांसमोरील वसुलीची समस्या सोडवण्यासाठी कायदा कलम १०१ चे दाखले त्वरित उपलब्ध करून देण्याचे मान्य करण्यात आले. कलम १५६ अंतर्गत अधिकारांचा कालावधी तीन वर्षे करण्याचे मान्य करण्यात आले असून, अपसेट प्राईसची मुदत एक वर्ष करण्यात येणार आहे. कर्ज वसुलीसाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलिस प्रशासनामध्ये समन्वय साधून वसुली प्रक्रियेत गतिमानता आणण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
​तसेच पतसंस्थांच्या विकासासाठी शाखा विस्तार व कार्यक्षेत्र वाढीची परवानगी प्रक्रिया सुलभ व जलद करण्यात येईल, नविन मॉडेल उपविधींना तातडीने मंजुरी देण्यात येईल आणि नियामक मंडळ अधिक सक्षम केले जाईल असे सांगण्यात आले. राज्यातील पगारदार व नोकरदार पतसंस्थांच्या समस्यांवरही त्वरित तोडगा काढला जाणार आहे.
​सहकार भारतीने मांडलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्या. सावंतवाडीचे अध्यक्ष सुनिल राऊळ यांनी जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण बिगरशेती व पगारदार पतसंस्थांच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, सहकार सचिव प्रविण दराडे, अप्पर सचिव संतोष पाटील, सहकार आयुक्त दिपक तावरे आणि सहकार भारतीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा