सावंतवाडी : सर्वोदय नगर येथे भाजपच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शेअर करा

पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश; आमदार प्रमोद जठार व मान्यवरांच्या हस्ते १५ विविध वृक्षांची लागवड

सावंतवाडी,दि.५ जून
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे सर्वोदय नगर येथे आयोजन करण्यात आले होते. कांचन, मोहगणी, बहावा अशा प्रकारची १५ झाडे आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांसह मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अभियानांतर्गत यावेळी “एक पेड माँ के नाम” हा उपक्रम राबवण्यात आला. आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घ्यावी असे आवाहन आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी केले. तसेच, निसर्गाच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. वृक्षारोपणाच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेत प्रत्येक विभागातील बूथवर किमान २५ झाडे लावण्याचे निर्देश आम. जठार यांनी सर्व नगरसेवकांना दिले आहेत. शहराचा परिसर हिरवागार आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, महिला मोर्चा अध्यक्षा श्वेता कोरगावकर, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, मंडल अध्यक्ष व आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, रणजीत देसाई, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, नियोजन समिती सभापती आनंद नेवगी, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, तसेच निलम नाईक, सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे आणि शिवसेना नगरसेवक अजय गोंदावले उपस्थित होते. या मोहिमेत भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रदेश, जिल्हा, तालुका, शहर आणि बूथ पातळीवरील पदाधिकारी, तसेच सर्व आघाड्यांचे अध्यक्ष व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वृक्षारोपण उपक्रमामुळे सावंतवाडी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले.

दरम्यान, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार श्री. जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी त्यांचे स्वागत केले. शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेत असताना आमदार जठार यांनी सावंतवाडीच्या प्रगतीसाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सावंतवाडीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून, शहराच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम केले जाईल, असेही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

शेअर करा