तालुका वकील संघटनेतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे बारावे पुष्प; सीए सुधीर नाईक यांचे मार्गदर्शन
सावंतवाडी,दि.१७ ऑक्टोंबर
तालुका वकील संघटने तर्फे आयोजित “लेक्स डिस्कशन” ह्या व्याख्यानमालेतील बारावे पुष्प सावंतवाडी येथील दिवाणी न्यायालय येथे आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाच्या बाराव्या पुष्पाचे प्रमुख वक्ते म्हणून सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सुधीर नाईक हे होते. या व्याख्यानाचा विषय ‘कर आणि गुंतवणूक’ असा होता.
बदलत्या आर्थिक धोरणांच्या काळात नागरिकांनी आपल्या कष्टाच्या पैशांचे योग्य नियोजन करणे आणि कर रचनेची अचूक माहिती ठेवणे ही आजच्या काळाची मोठी गरज बनली आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सुधीर नाईक यांनी केले. सावंतवाडी वकील संघटनेच्या वतीने आयोजित ‘लेक्स डिस्कशन’ या विशेष व्याख्यानमालेत ‘करांचे व्यवस्थापन आणि सुरक्षित गुंतवणूक’ या विषयावर ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
सीए सुधीर नाईक यांनी प्राप्तिकर कायद्यातील नवीन बदल आणि लागू असणाऱ्या कर सवलतींची सोप्या भाषेत माहिती दिली. कायदेशीर क्षेत्रातील व्यावसायिकांनी आणि नागरिकांनी आपला पैसा सुरक्षितपणे वाढवण्यासाठी म्युच्युअल फंड, शेअर्स आणि मुदत ठेवी यांमध्ये कसा समतोल साधावा, हे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाला टर्म इन्शुरन्स व मेडीकल क्लेम कसा महत्वाचा आहे याचे विस्तृत वरण त्यांनी केले. व्याख्यानानंतर झालेल्या खुल्या चर्चेत उपस्थित वकिलांनी विचारलेल्या क्लिष्ट करविषयक प्रश्नांना नाईक यांनी अत्यंत सोपी उत्तरे दिली. साधारण दिड तास चाललेल्या या चर्चासत्रामध्ये वकिलांच्या व विधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनच्या विविध प्रश्नांची सीए सुधीर नाईक यांनी उत्तरे दिली. सीए सुधीर नाईक यांचे स्वागत वकील संघटनेच्या वतीने सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाळाजी बाबुराव रणशूर यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा महिला उपाध्यक्ष अॅड. नीता गावडे, सावंतवाडी वकील संघटनेचे अॅड. राघवेंद्र नार्वेकर, अॅड. वीरेश राऊळ, अॅड. राबिया आगा, अॅड. अंकुश ठाकूर, अॅड. अलका कासकर, अॅड. राहुल मडगावकर, अॅड. वामन निर्गुण, इत्यादी वकीलवर्ग तसेच विधी विद्यालयाचे बहुतांश विद्यार्थी हजर होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. राबिया आगा व आभार प्रदर्शन सावंतवाडी तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाळाजी रणशूर यांनी केले.