सावंतवाडी ,दि.०३ ऑगस्ट
शहरातील शिल्पग्राम रिसॉर्ट परिसरात एक मोठा गुलमोहरचा वृक्ष अचानक रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. झाड थेट रस्त्यावर पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक विलास जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ झाड हटवण्याचे काम हाती घेतले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने झाडाच्या फांद्या व बुंधा बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
नगरपरिषद कर्मचारी आणि माजी नगरसेवक विलास जाधव यांच्या या तत्पर कारवाईमुळे विस्कळीत झालेली वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत सुरू झाली असून नागरिक व वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.