सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील मोफत सर्जिकल धाग्याबाबत आरोग्य कृती समितीचे सवाल

शेअर करा

प्रसूतीवेळी बाहेरून धागा आणण्यास कोणी सांगितले, कशासाठी सांगितले?; डॉ. संदीप सावंत यांच्याकडे जाब, आरोग्य समस्यांवर सविस्तर चर्चा

सावंतवाडी,दि.०५ जुन

सावंतवाडी : मार्च महिन्यात झालेल्या प्रसृतीवेळी इथल्या कर्मचाऱ्यांनी मोफत दिला जाणारा सर्जीकल धागा बाहेरून आणायला का सांगितला ? तो कुणी सांगितला ? कशासाठी सांगितला ? असे सवाल आरोग्य कृती समिती सिंधुदुर्गकडून करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांना त्यांनी याबाबत जाब विचराला. यावेळी मी नुकताच पदभार स्वीकारला असून आताच्या घटनांबद्दल सांगू शकतो.‌ दोन महिन्यांपूर्वी तो धागा कोणी आणायला सांगितला हे सांगू शकत नाही असे मत प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीप सावंत यांनी व्यक्त केले. यावेळी आरोग्य समस्यांवरून कृती समिती व डॉक्टर यांच्यामध्ये बराचवेळ चर्चा घडली.

यावेळी कृती समितीचे अध्यक्ष एन.बी. रेडकर म्हणाले, इथल्या समस्या व मशीनरीबाबत आम्ही त्यांना प्रश्न विचारले. तर मार्च महिन्यात झालेल्या दोन प्रसृतीवेळी इथल्या कर्मचाऱ्यांनी मोफत दिला जाणारा सर्जीकल धागा बाहेरून आणायला सांगितला. तो कुणी सांगितला ? कशासाठी सांगितला आदी प्रश्न विचारले असता समर्पक उत्तर मिळाली नाहीत. याची चौकशी वरिष्ठांकडून आदेश आल्यावर करू अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे यावर योग्य ती चौकशी होऊन कारवाई व्हावी अशी मागणी श्री. रेडकर यांनी केली. तर इथे औषध पुरवठा मुबलक असताना बाहेरून औषध आणायला सांगितली जातात. शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयांशी संपर्क साधून आपणच बदनामी केली जात आहेत. आज खासगी रुग्णालयाची जाहीरात हॉस्पिटलमध्ये का ? ते विचारलं असता अधिक्षक बैठकीतून उठून गेले. हा कृती समितीचा केलेला अपमान आहे‌ असं मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच जिल्हा आरोग्य दरबारातून लोकप्रतिनिधींच लक्ष वेधूनही त्यावर योग्य कारवाई झाली नाही. आश्वासन देऊन ते पूर्ण झालेलं नसल्याने पुन्हा आंदोलन करायची वेळ आमच्यावर आली आहे‌. डॉ.‌ ऐवळेंना दोन वर्षांची मुदतावढ मिळावी म्हणून आरोग्य मंत्र्यांसह जिल्ह्यातील नेत्यांचही लक्ष वेधले. मात्र, त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आज ते पद रिक्त झाले आहे‌. त्यामुळे आत उपजिल्हा रुग्णालयास पूर्णवेळ वैद्यकीय अधिक्षक मिळावा अशी आमची मागणी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

याबाबत झालेल्या बैठकीत रुग्णालयातील रिक्त पदांसह मशिनरी, औषध पुरवठा आदी विषयांवरून कृती समितीच्या सदस्यांनी सवाल उपस्थित केले. यावेळी प्र. वैद्यकीय अधिक्षक डॉ संदिप सावंत, डॉ. निखिल अवधूत, डॉ. धीरज सावंत आदी उपस्थित होते. याप्रसंगी हेमंत वागळे यांनी शासकीय रुग्णालयात खासगी रुग्णालयांची जाहीरात कशासाठी ? इथल्या डॉक्टरांना कमिशन मिळतात का ? असा सवाल केला. यावेळी डॉ. निखील अवधूत यांनी संबंधित डॉक्टरांची नाव जाहीर करा असे आवाहन केले. तर ही जाहिरात आजच दिसली का ? असा सवाल डॉ. संदीप सावंत यांनी केला. यावेळी कृती समिती व डॉक्टर यांच्यात यावरून जोरदार चर्चा झाली. यावेळी आरोग्य कृती समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष एन. बी. रेडकर, ॲड. तेजस परब, संजय पिळणकर, हेमंत वागळे, रूपा मुद्राळे, रवी जाधव, शिवा गावडे, रूपेश परब, राहूल परब, भारती कासार आदी उपस्थित होते.

शेअर करा