सावंतवाडी, दि. ९ जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून पुढील पाच दिवस जिल्ह्यात सर्वत्र पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. भारतीय कृषी हवामान शास्त्र विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या अंतर्गत ग्रामीण कृषी मौसम सेवा (उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे) तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १० जून ते १४ जून २०२६ या कालावधीचा मध्यम मुदतीचा जिल्हास्तरीय हवामान अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यात आज सरासरी १८.९५ मिमी पाऊस:
आज, ९ जून रोजी जिल्ह्यात सरासरी १८.९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये देवगड तालुक्यात सर्वाधिक ३८ मिमी पाऊस झाला. तर इतर तालुक्यांमध्ये अनुक्रमे दोडामार्ग ३०.६ मिमी, सावंतवाडी २५ मिमी, कुडाळ १६ मिमी, मालवण १४ मिमी, वेंगुर्ला १४ मिमी, वैभववाडी १० मिमी आणि कणकवली येथे सर्वात कमी ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
असा असेल पुढील ५ दिवसांचा अंदाज:
पुढील ५ दिवसांत जिल्ह्याचे कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या पाचही दिवसांत आकाश अंशतः ते पूर्णपणे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या वेळी हवेतील सापेक्ष आर्द्रता ८९% ते ९३% तर दुपारच्या वेळी ६१% ते ७६% इतकी राहील.
वाऱ्याचा वेग: वाऱ्याचा वेग ताशी २ ते ६ किमी राहण्याचा अंदाज असून, वाऱ्याची दिशा मुख्यत्वे दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) आणि पश्चिम दिशेकडून असणार आहे.
शेतकऱ्यांना नियोजनाचे आवाहन:
हा पावसाचा अंदाज लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीकामांचे आणि बाजारातील मालाचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल, असे आवाहन कृषी मौसम सेवेकडून करण्यात आले आहे.