सावंतवाडी,दि.०१ जुलै
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली घाटातील धबधबे प्रवाहित होत आहेत. पुर्ण क्षमतेने धबधबे प्रवाहित होत नसले तरी येत्या शनिवारी आणि रविवारी पर्यटकांची वर्दळ वाढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आंबोली च्या पावसाळी पर्यटनाला उशिराने सुरुवात होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्यात उशिराने सक्रिय झालेल्या मान्सूनने आता मात्र रौद्ररूप धारण केले असून, जिल्ह्यातील नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, हा पाऊस शेती आणि बागायतीसाठी दिलासादायक मानला जात आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा आता शेतीच्या कामात व्यस्त झाला असून भातशेतीच्या लावणीच्या कामांना वेग आला आहे. ओढे-नाले भरून वाहत असल्याने शेतांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. काजू आणि आंबा बागायतीलाही या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी काही सखल भागांतील बागांमध्ये पाणी साचल्याने आणि जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास नव्या लागवडीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी नोंद झालेल्या आकडेवारीनुसार सरासरी ९०.७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात १३१ मिमी आणि कणकवली तालुक्यात १२९ मिमी नोंदवला गेला. याशिवाय देवगड १०० मिमी, दोडामार्ग ९० मिमी, सावंतवाडी ७४ मिमी, वैभववाडी ७२ मिमी, वेंगुर्ला ७० मिमी आणि मालवणमध्ये ६० मिमी पाऊस झाला आहे.
बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत असून, थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोली घाटातील धबधबे प्रवाहित होत आहेत. त्यामुळे येत्या शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.