सावंतवाडी,दि.०९ जुलै
येथील सालईवाडा भागातील बीएसएनएलचे मुख्य कार्यालय आणि उपवनसंरक्षक (डीसीएफ) यांच्या निवासस्थाना जवळ असलेल्या श्री. नाईक यांच्या घराशेजारील कंपाऊंड वॉलमध्ये पाच गवा रेड्यांचा कळप शिरल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास समोर आली आहे.
भरवस्तीत पाच गवा रेड्यांचा कळप थेट घरांच्या कुंपणाजवळ आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला तात्काळ माहिती दिली असून, वनविभागाचे पथक या गव्यांना पुन्हा जंगलाच्या दिशेने हाकलण्यासाठी काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहराच्या नागरी वस्तीत गव्यांचा वावर वाढल्याने वनविभागाने रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.