सावंतवाडी, दि. १२ जुलै
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या आरेकर खानावळीत काम करणाऱ्या सौ. समीक्षा संतोष परब (वय ४०, रा. कारिवडे पेडवेवाडी) यांना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या पटांगणात काम करताना सर्पदंश झाला.
घटना घडताच खानावळ मालक निलेश आरेकर व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील डॉ. वैभव बदरवाड व डॉ. सभा खान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनिकेत गुरव यांनी तातडीने उपचार सुरू केले. लॅब व मॅन्युअल पद्धतीने झालेल्या रक्त तपासणीत कोणत्याही प्रकारची विषबाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या प्रसंगी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर आणि सामाजिक बांधिलकीचे संयोजक रवी जाधव यांनी रुग्णालयात धाव घेत भयभीत झालेल्या परब कुटुंबियांना धीर दिला व डॉक्टरांना योग्य काळजी घेण्याची विनंती केली.