सावंतवाडी,दि.०५ जुलै
शनिवार, ४ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तालुक्यामधील मासूरे आणि सांगेली या गावांना या वादळाचा मोठा फटका बसला असून अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत.
तालुक्यातील मासूरे गावात अतिवृष्टीमुळे तब्बल ३ घरे पूर्णतः कोसळली असून २७ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तसेच सांगेली येथेही १ घर पूर्णपणे पडल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या आपत्तीबाबत माहिती देताना सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सांगितले की, “बाधित क्षेत्राची पाहणी केली जात असून महसूल विभागामार्फत तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रशासकीय मदत दिली जाईल.”