सावंतवाडी : आंबोली घाटात मोठे दगड कोसळले; सुदैवाने अनर्थ टळला

शेअर करा

सावंतवाडी,दि.१४ जून

आंबोली घाटात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने काही अंतरावर असलेल्या ठिकाणी सुमारे ५० मीटर उंच कड्यावरून दोन भलेमोठे दगड घरंगळत रस्त्यावर आले. यातील एक मोठा दगड संरक्षक कठडा व रेलिंग तोडून हजारो फूट खोल दरीत कोसळला, तर दुसरा दगड रस्त्यावरच अडकून राहिला.

सुदैवाने दगड कोसळण्याच्या वेळी त्या ठिकाणी कोणतेही वाहन किंवा पर्यटक नसल्याने मोठा अनर्थ टळला. अद्याप पावसाळी पर्यटन हंगाम पूर्णपणे सुरू झालेला नसल्याने तसेच रविवार असूनही गर्दी कमी असल्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली.

घटनेची माहिती वाहनचालकांनी आंबोली पोलीसांना दिल्यानंतर आंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संतोष गलोली, लक्ष्मण जाडे, गौरव परब आणि सचिन चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच सावंतवाडी येथून पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर अडकलेला दगड हटविण्यात आला आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.

या घटनेनंतर स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळी बसविण्याची आवश्यकता होती, त्या ठिकाणी जाळी बसविण्यात आलेली नाही, तर कमी धोका असलेल्या भागात जाळी बसविण्यात आली आहे. त्यामुळे आंबोली घाटातील अशा धोकादायक कड्यांची तातडीने पाहणी करून जोखीम असलेल्या ठिकाणी संरक्षणात्मक जाळी बसविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या आंबोली परिसरात ऊन-पावसाचा खेळ सुरू असून कड्यांमधील माती सैल होणे आणि दगड निखळण्याच्या घटना घडू शकतात. पावसाळी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणांची ओळख करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. दरम्यान, घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी व पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, कड्यालगत वाहने उभी करू नयेत आणि धोकादायक ठिकाणी थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा