सावंतवाडी दि.६ जून
सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तिकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व गणेश मूर्तिकारांच्या प्रमुख मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मंगळवार, दिनांक १० जून रोजी सकाळी ठीक १० वाजता कुडाळ येथील मराठा समाज हॉल (कुडाळ हायस्कूलच्या बाजूला) येथे होणार आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व गणेश मूर्तिकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश मूर्तिकार संघाने केले आहे.
या मेळाव्यामध्ये संघाच्या ज्या आजीवन सभासदांची ओळखपत्रे तयार झाली आहेत, त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच ज्या अनेक आजीवन सदस्यांची ओळखपत्रे अद्याप तयार करायची आहेत, त्यांची प्रक्रियाही केली जाणार आहे. तरी मूर्तिकारांनी येताना सोबत आपल्या आधार कार्डची स्वाक्षरी केलेली झेरॉक्स (स्व-साक्षांकित) आणि स्वतःचा एक फोटो सोबत आणावा, अशी सूचना देण्यात आली आहे.
याशिवाय, आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण पूरक गणेश मूर्तींचे पूजन करण्याबाबतच्या आवाहन पत्रांचे वितरणही या मेळाव्यात केले जाणार आहे. सर्व मूर्तिकारांनी वेळेवर उपस्थित राहावे, तसेच आपल्या संपर्कातील व जवळच्या इतर मूर्तिकारांनाही या मेळाव्याबाबत अवगत करून देऊन उपस्थित राहण्यास सांगावे, असे आवाहन श्री गणेश मूर्तिकार संघ कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे.