सावंतवाडी, दि. ६ जून
दाणोली जवळील सातोळी तिठा येथे शनिवारी सायंकाळच्या सुमारास बेकायदेशीर आणि विनापरवाना गोवंश प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ७ प्राण्यांची सुटका करत दोन्ही वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी चौघांविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत आरोपी नागराज रामन्ना जैन (वय ४२), रामचंद्र नारायण सिद्धी (वय ४३, दोघे रा. यल्लापूर, जि. उत्तर कन्नड, कर्नाटक), अजित नारायण धवन (वय ३७, रा. न्हावेली चौकेकरवाडी, ता. सावंतवाडी) आणि प्रकाश बाळा कोरगावकर (वय ७१, रा. मळगाव कुंभार्ली रस्तावाडी, ता. सावंतवाडी) हे ‘छोटा दोस्त’ (क्र. KA-31-A-3106) आणि ‘टाटा एस’ (क्र. MH-09-CA-7816) या दोन टेम्पोमधून प्राण्यांची वाहतूक करत होते.
हे आरोपी कोणत्याही परवान्याशिवाय राजापूर ते कर्नाटक अशा पद्धतीने तीन गायी, एक वासरू आणि तीन बैल अशी एकूण ७ जनावरे वाहनातून घेऊन जात असताना सातोळी तिठा येथे पकडले गेले. पोलिसांनी सर्व प्राण्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित गोशाळेत रवाना केले आहे, तसेच दोन्ही वाहने जप्त केली आहेत.
याप्रकरणी ट्रॅफिक पोलीस जमादार श्री. आंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष गलोले करत आहेत.