सावंतवाडी : सिंधुदुर्गात वफोली येथे बेकायदेशीर वृक्षतोड तर बांदा येथे डोंगरफोड; ‘वनशक्ती’ची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

शेअर करा

सावंतवाडी,दि. १८ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वफोली येथे नदीलगतचे सुमारे १० एकर घनदाट जंगल बेकायदेशीरपणे तोडण्यात आले असून, बांदा येथे कोणतीही पर्यावरणीय मंजुरी (EC) न घेता डोंगर फोडून १.५ लाख चौरस मीटर क्षेत्रात गोल्फ कोर्स टॉऊनशिप उभारली जात असल्याचा गंभीर आरोप ‘वनशक्ती’ या स्वयंसेवी संस्थेने केला आहे. याप्रकरणी संस्थेचे संचालक स्टॅलिन डी. यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी आणि सावंतवाडीच्या उपवनसंरक्षकांना (DCF) ई-मेलद्वारे तक्रार पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.


तक्रारीनुसार, सावंतवाडी-दोडामार्ग वन्यजीव कॉरिडॉरमधील २५ गावांना उच्च न्यायालयाने ‘पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ (ESA) घोषित केले असले, तरी लगतच्या गावांमध्ये सर्रास वृक्षतोड सुरू आहे. कॉरिडॉरचे नुकसान होत असल्याने वाघ आता गावांच्या हद्दीत शिरून पाळीव प्राण्यांची शिकार करत आहेत. यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढून निष्पाप माणसांचा जीव धोक्यात येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. वफोली येथील १० एकर सपाट केलेल्या जागेचा भू-वापर बदलण्यास किंवा तिथे रिसॉर्ट आणि टॉऊनशिपच्या बांधकामास परवानगी देऊ नये, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


बांदा येथे एका कंपनीने कोणतीही पर्यावरणीय मंजुरी न घेता टॉऊनशिप उभारत असल्याचा आरोप पत्रात केला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान तिथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन, तीव्र उताऱ्यांचे टेकड्या कटिंग, रस्ते निर्मिती, सीमा भिंती आणि वृक्षतोड सुरू असल्याचे निष्पन्न झाल्याचे स्टॅलिन डी. यांनी स्पष्ट केले.


​कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा:
प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून आणि उपग्रहाद्वारे मिळालेल्या फोटोंची (Google Earth) पडताळणी करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, तसेच जंगलाचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी ‘वनशक्ती’ने केली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि कणकवलीमध्ये पर्यावरणीय मंजुरींना धाब्यावर बसवून कामे सुरू राहिल्यास उच्च न्यायालयात एकत्रित याचिका (Composite Writ) दाखल करण्याचा इशाराही संस्थेने दिला आहे.

शेअर करा