सावंतवाडी,दि.११ ऑगस्ट
इन्सुली (ता. सावंतवाडी) गावातील ग्रामपंचायत आणि इतर विविध योजनांअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची प्रलंबित बिले तात्काळ मिळावीत, या मागणीसाठी इन्सुली येथील स्थानिक नागरिकांनी येत्या १५ ऑगस्ट रोजी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन गटविकास अधिकारी (वर्ग-१), पंचायत समिती सावंतवाडी यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, इन्सुली गावातील प्राथमिक शाळा इमारत दुरुस्ती, रस्ते डांबरीकरण, गटार कॉंक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसवणे, नळ योजना दुरुस्ती आणि अंगणवाडी कामांसह अनेक विकासकामे मुदतीत व पूर्ण गुणवत्तेसह पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, ही कामे पूर्ण होऊनही प्रशासनाकडून त्यांची बिले प्रदीर्घ काळापासून प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.
प्रलंबित बिलांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही व शांततेच्या मार्गाने १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर श्री. रामचंद्र चराटकर, श्री. कुणाल पोकळे, श्री. ऋषिकेश पेडणेकर, श्री. सचिन परब, श्री. नंदकिशोर कोचरेकर आदींच्या सह्या आहेत. तसेच या निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषद अध्यक्ष (सिंधुदुर्ग), मुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प. सिंधुदुर्ग), पोलीस निरीक्षक (बांदा पोलीस ठाणे) आणि प्रशासक (ग्रामपंचायत इन्सुली) यांना माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.