गाळेधारकांची पुन्हा बैठक घेणार; भाडे टप्प्याटप्प्याने वसुली आणि प्रीमियमबाबत पुढील बैठकीत धोरणात्मक निर्णय
सावंतवाडी,दि.१० सप्टेंबर
इंदिरा गांधी संकुलातील गाळे धारकांचे भाडे आणि प्रिमियम थकित आहेत. यावरून नगरपरिषद मासिक बैठकीत चर्चा झाली. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाडे टप्प्याटप्प्याने घेऊन थकित प्रिमियम माफ करता येईल का याबाबत नगराध्यक्षा यांनी तपासून पहावे असे सुचविले तर नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांनी आपण गाळे धारकांची बैठक घेऊन चर्चा केली होती पुन्हा एकदा चर्चा करून भाडे आणि प्रीमियम बाबत धोरणात्मक निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
सावंतवाडी नगरपरिषद मासिक बैठक नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर व मुख्याधिकारी विनायक औंधकर उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीलाच ठराव आणि टिप्पणी वाचनावर नगरसेवक संजू परब यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी वस्तुस्थिती सभागृहात सांगावी अशी मागणी केली तेव्हा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.यावर नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांनी हस्तक्षेप करत तोडगा काढत पुढच्या बैठकीत बदल केला जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर पुढील विषय वाचण्यास सहमती दिली. दरम्यान शहरात भटक्या कुत्र्यांना अन्न खाण्याचे प्रकार पुढे आले आहेत त्यामुळे कुत्र्यांची संख्या शहरात वाढली असून यावर निर्बंध आणण्यासाठी अशा प्रकारचे अन्न घालण्याची चार ठिकाणं नगरपालिकेकडून निश्चित करण्यात आली असून त्याच ठिकाणांमध्ये जाऊन नेमणूक केलेल्या व्यक्तीने कुत्र्यांना जेवण देणे अनिवार्य असल्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी नियम व अटीची तरतूदही असणार असे सांगण्यात आले या चार ठिकाणांमध्ये झिरंग भाग, चिटणीस नाका परिसर, मियाॅसाब समाधी परिसर व मोरडोंगरी परिसरामध्ये जागा निश्चिती करण्यात आली आहे, सभापती प्रतीक बांदेकर यांनी माहिती दिली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही निश्चिती केली आहे असे त्यांनी सांगितले. नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांनी जरूर तर काही हरकती असल्यास उद्या पर्यंत कळवा असे स्पष्टीकरण दिले.
नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी कॉम्प्लेक्समधील दुकान गाळेधारकांना भाडाची रक्कम भरणा करण्यास मुदत मिळण्यासंदर्भात व प्रीमियम रक्कम भरण्यास सूट मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली यावेळी नगरसेवक संजू परब यांनी प्रीमियम रक्कम माफ होऊ शकते का या संदर्भात विचार करण्यात यावा तर गाळे भाडे हे तीन टप्प्यात वसूल करण्यात यावे असे सुचविले यावर नगराध्यक्षांनी गाळे भाडे वसूल केल्यानंतरच प्रीमियम संदर्भात निर्णय घेऊ आपल्यापर्यंत अद्यापही एकही व्यापारी आलेला नाही त्यामुळे व्यापाऱ्यांची मागणी आल्यास यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. शासनाच्या कचरा मुक्त अभियानाच्या संकल्पनेनुसार शहरातील विविध ठिकाणी जीव्हीपी पॉईंट सुशोभीकरण करणे यावर चर्चा झाली मात्र हे काम करत असताना शहरात शिल्पग्राम परिसरातील तिच्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो हा कचरा संपूर्ण रस्त्यावर पसरलेला असतो यावर चर्चा झाली. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शहरात तीन ठिकाणी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत असे सभापती सुधीर आडीवरेकर यांनी सांगितले. त्यानंतर संबंधितांवर मोठ्या रकमेची कारवाई करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावर शहरातील अन्य ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासंदर्भात निधीची मागणी करण्यात आली असल्याचे नगराध्यक्षांकडून सांगण्यात आले निधी उपलब्ध झाल्यास शहरातील बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील असे ते म्हणाले. उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर म्हणाले, मी स्वतः, आमदार दीपक केसरकर यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याशी चर्चा केली असून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव तयार केला जात आहे. त्याबाबत निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा सुरू आहे. स्वच्छता नव्हे तर चोऱ्या करणाऱ्यांना रोखता येईल म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहे असे उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर यांनी सांगितले.
सावंतवाडी शहरातील विविध वॉटर बॉडीचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात सभागृहात अहवाल वाचन करण्यात आला यावर मोती तलावामध्ये होणाऱ्या आत्महत्या आणि त्यावर उपाययोजना म्हणून तलावाच्या कड्याच्या बाजूने रेलिंग उभारण्याची मागणी उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी केली हेच मागणी अँड निता कविटकर यांनी करत आत्महत्या रोखण्यासाठी योग्य त्या उपयोजना आखा असे त्या म्हणाल्या. तर सभापती प्रतीक बांदेकर यांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरात तलावाच्या काठावर चार लोकांच्या टीमची नियुक्ती करा असे सांगितले. नगरसेवक संजू परब यांनी मोती तलावाच्या काठावरून आत्महत्या होणार नाही याची काळजी घ्यावी नगरपरिषदेने यंत्रणा, प्रशिक्षण आणि साधनसामग्री उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली.
नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले म्हणाल्या,या सर्वांच्या मागणीचा विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगत बोटींग प्रकल्प, कर्मचाऱ्यांना आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे सांगितले.
नगरसेवक संजू परब यांनी मोती तलावात सांडपाणी सोडले जात आहे याकडे लक्ष वेधले.तलावातील दूषित झालेल्या पाण्यावर नाराजी व्यक्त करत ड्रेनेजचे पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा त्याचबरोबर गणपती उत्सव जवळ आल्याने विसर्जनासाठी तलावातील पाणी स्वच्छ ठेवा अशी मागणी केली.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामावर चर्चा..
सावंतवाडी शहरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासंदर्भात शासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित ठेकेदार कंपनीला आवश्यक डीपीआर सर्वे व अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्याबाबत सभागृहात चर्चा झाली यावेळी मोती तलावाचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने आणि सांडपाण्याचा प्रश्न कायमचा मिळण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प योग्य असल्याच्या भावाला सभागृहातील सर्वच नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात आल्या. यावर चर्चा होत असतानाच उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कार्यभार असताना सर्वात प्रथम प्राधान्याने या प्रकल्पावर आम्ही गांभीर्याने काम केल्याचे स्पष्ट करत सदर प्रकल्पासाठी स्मशानभूमीच्या बाजूला जागा निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचे काम हे एकाच वेळी प्रत्येक प्रभागातून सुरू केले जाईल असेही ते म्हणाले.